सांडपाण्याच्या नाल्यावर प्राचीन मंदिराचा स्तंभ ठेवण्यात आल्याचे छायाचित्र ट्विटर प्रसारित झाल्यावर हिंदूंचा संताप

हिंदूंच्या संतापानंतर प्रशासन, पोलीस आणि पुरातत्व विभाग सक्रीय

हिंदूंना त्यांच्या प्राचीन सांस्कृतिक ठेव्याचे मोल नसल्याने ते अशा प्रकारची कृती करतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात ! तसेच सरकार, प्रशासन आणि पुरातत्व विभागही निष्क्रीय रहाते !

कांचीपूरम् (तमिळनाडू) – ट्विटरवरील धर्म रक्षक नावाच्या वापरकर्त्याकडून तमिळनाडूतील कांचीपूरम् येथील पेरियामध्ये सांडपाणी वाहून नेणार्‍या नाल्याचे छायाचित्र पोस्ट करण्यात आले होते. या नाल्यावर प्राचीन मंदिरांमध्ये असलेल्या स्तंभाप्रमाणे विविध चित्र आणि आकृत्या असणारा स्तंभ ठेवण्यात आल्याचे दिसून येत होते. यावर सामाजिक माध्यमांतून संताप व्यक्त करण्यात आला. हे छायाचित्र पाहून काही जणांनी हा स्तंभ ६०० वर्षांपूर्वीच्या शिवमंदिराचा असल्याचा दावा केला; मात्र याविषयी कुठलाही अधिकृत तपशील समोर आलेला नाही.

(ही छायाचित्रे प्रसिद्ध करण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक)

एका  ट्विटर वापरकर्त्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे छायाचित्र ‘टॅग’ करून याकडे लक्ष देण्याची मागणी केली. त्यानंतर प्रशासनाने हा स्तंभ तेथून उचलून जिल्हाधिकारी कार्यालयात नेला. यानंतर पोलिसांनी या प्रकाराची चौकशी करण्यास प्रारंभ केला आहे, तसेच पुरातत्व खात्यानेही याची नोंद घेतली आहे.