पणजी, २७ डिसेंबर (वार्ता.)- इंग्लंड येथून गोव्यात आलेले अनेक जण कोरोनाबाधित असल्याचे आढळत आहे. ही एक गंभीर गोष्ट आहे. कोरोनाच्या नवीन विषाणूचा संसर्ग गोव्यात होऊ नये, यासाठी इंग्लंड येथून आलेल्या आणि कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झालेल्यांना संस्थांत्मक अलगीकरण (इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन) बंधनकारक करावे, अशी सूचना आमदार रोहन खंवटे यांनी केली आहे. इंग्लंड येथून ९ डिसेंबरनंतर गोव्यात आलेल्या सुमारे ९०० लोकांची आरोग्य खाते कोरोनाविषयक चाचणी करत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार खंवटे यांनी ही मागणी केली.
इंग्लंड येथून काणकोण येथे आलेले ५ जण कोरोनाबाधित
काणकोण सामाजिक आरोग्य केंद्राने दिलेल्या माहितीनुसार काणकोण येथे ९ ते २३ डिसेंबर या कालावधीत १६ जण इंग्लंड येथून काणकोण येथे आले आहेत आणि यामधील ५ जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या कोरोनाबाधित रुग्णांना मडगाव येथील इ.एस्.आय्. रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. या ५ मधील २ रुग्णांचे कोरोनाशी संबंधित नमुने कोरोनाच्या नवीन विषाणूच्या विशेष चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत