आणखी २४ आरोपींना गुन्हे अन्वेषण विभागाकडून अटक !

  • पालघर येथे झालेले साधूंचे हत्याकांड प्रकरण

  • ५ अल्पवयीनांचा समावेश

पालघर, २४ डिसेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील गडचिंचले येथे झालेल्या साधूंच्या हत्याकांड प्रकरणात २ साधू आणि त्यांचा वाहनचालक अशा तिघांची जमावाने हत्या केली होती. या हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने आणखी २४ आरोपींना अटक केली आहे. त्यात ५ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यातील १९ आरोपींना डहाणू न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, तर ५ अल्पवयीन मुलांना भिवंडी येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

१६ एप्रिल २०२० या दिवशी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे २ साधू आणि वाहनचालक यांना जमावाने ठार मारले होते. या प्रकरणात आतापर्यंत कासा पोलीस ठाण्यातील २ पोलीस अधिकारी आणि ३ कर्मचारी यांचे निलंबन, तर ३५ कर्मचार्‍यांचे जिल्ह्यात अन्य ठिकाणी स्थानांतर करण्यात आले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ७ मे या दिवशी गडचिंचले येथील घटनास्थळाचा दौरा केला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला होता. आतापर्यंत या प्रकरणात २४८ आरोपींना अटक करण्यात आली असून १०५ जणांना न्यायालयाने जामीन संमत केला आहे.