२५ डिसेंबर २०२० या दिवशी ‘गीता जयंती’ आहे. या निमित्ताने…
‘गीतेच्या उपदेशाचे महत्त्व अखिल मानवजातीसाठी आहे; कारण गीतेने जगण्याची कला शिकवली आहे. गीता आम्हाला जगायला शिकवते. आत्म्याचे एकतत्त्व गीताशास्त्रात सांगितले आहे आणि ते सर्वांनी जाणून घेणे योग्य आहे.
भगवान विष्णु आपल्या स्थितीचे वर्णन करतो, ‘गीतेच्या पहिल्या ५ अध्यायांना भगवान श्रीविष्णूचे मुख समजावे. पुढील १० अध्यायांना श्रीविष्णूचे हात समजावेत. नंतर एका अध्यायाला श्रीविष्णूचे उदर (पोट) आणि शेवटच्या दोन अध्यायांना श्रीविष्णूचे चरणकमल समजावे. याप्रमाणे १८ अध्यायांची गीतेची ही वाङ्मयरूपी मूर्ती समजावी. भगवान श्रीविष्णु सर्व जगाचा पालनकर्ता आहे.’
अध्याय क्र. १
जो कुणी गीतेच्या प्रथम अध्यायाचे पठण, श्रवण आणि अभ्यास करतो, त्याची पापे नष्ट होतात अन् त्याला हा भवसागर तरून जाण्यास कोणतीही अडचण येत नाही.
अध्याय क्र. २
जो कुणी गीतेच्या दुसर्या अध्यायाचा अभ्यास आणि पठण करील, तसेच अनेक वेळा पुनरावृत्ती करील, त्यास सहज मोक्ष प्राप्त होईल.
अध्याय क्र. ३
या अध्यायाच्या पठणाने आपल्या जातींच्या जिवांचा (लोकांचा) आणि समस्त नारकीय जिवांचा उद्धार होतो अन् त्यांना श्रीविष्णुधाम प्राप्त होते.
अध्याय क्र. ४
या अध्यायाच्या पठणामुळे अंतःकरण निर्मळ (शुद्ध) होते, तसेच या भयानक संसार सागरातून आपण मुक्त होतो आणि जप करून आपला उद्धार होऊन मोक्षप्राप्ती होते.
अध्याय क्र. ५
या अध्यायाचे पठण, जप आणि श्रवण केल्यामुळे महापापी व्यक्तीलाही ब्रह्मज्ञान प्राप्त होते. व्यक्ती शुद्धचित्त होते.
अध्याय क्र. ६
जो मनुष्य नेहमी या एकाच अध्यायाचा जप करतो, तो श्रीविष्णूच्या स्वरूपाला प्राप्त होतो आणि त्याची तेजोराशी (तेज) देवतांनाही सहन होत नाही.
अध्याय क्र. ७
गीतेच्या ७ व्या अध्यायाचे पठण प्राण्यांना जरामृत्यू आणि दुःखापासून दूर करते. पठण आणि श्रवण यांनी मानव सर्व पातकांपासून मुक्त होतो.
अध्याय क्र. ८
श्रवण, जप आणि पठण केल्यामुळे ज्ञान प्राप्त होते आणि पापाच्या चंगुलातून मुक्त होऊन परम धाम प्राप्त होते. नेहमी चिंतन करत राहिले पाहिजे.
अध्याय क्र. ९
या अध्यायाचे पठण आणि जप केल्याने विपरीत ग्रहजन्य संकटे पार पडतात. परम शांती (मोक्ष) प्राप्त होते.
अध्याय क्र. १०
हा अध्याय म्हणजे स्वर्गरूपी किल्ल्यात जाण्याचा सुगम मार्ग आहे. दुर्लभ तत्त्वज्ञान प्राप्त होते. जीवनमुक्ती मिळते. श्रवणाने सर्व आश्रमांचे पालन करण्याचे फळ प्राप्त होते.
अध्याय क्र. ११
या अध्यायास ‘विश्वरूपदर्शन योग’ असेही म्हणतात. या अध्यायाच्या प्रभावामुळे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. पठणानेच परम कल्याणाची प्राप्ती होते. संसारभयाने भयभीत झालेल्या मनुष्याच्या आधि-व्यक्तीचा नाश, तसेच अनेक जन्मांच्या दुःखाचा नाश होतो. या अध्यायाचे माहात्म्य ऐकल्यामुळे महान पातकांचा नाश होऊन जातो.
अध्याय क्र. १२
या अध्यायाचा जप केल्याने अलौकिक शक्ती प्राप्त होते, ज्यामुळे मनुष्याला जीवन पुन्हा मिळू शकते आणि प्रतिदिन पठण केल्याने अनेक जीव मोक्ष प्राप्त होऊ शकतात.
अध्याय क्र. १३
या अध्यायाच्या अगाध माहात्म्याचे वर्णन श्रवण करून परम संतोष होतो. याच्या पठणाने पापी आणि दुराचारी व्यक्तींना मुक्ती मिळून दिव्य देह धारण करून स्वर्गलोक प्राप्त होतो.
अध्याय क्र. १४
या अध्यायाच्या पठणाने आणि जपाने भवबंधनातून सुटका होते. व्यक्ती जितेंद्रिय आणि ब्रह्मविद्येत प्रवीण होते अन् तिला परम गती प्राप्त होते.
अध्याय क्र. १५
या अध्यायाच्या पठणाने, जप करत अंतःकरण प्रसन्न होते आणि शुद्ध चित्त होऊन मोक्षप्राप्ती होते.
अध्याय क्र. १६
या अध्यायाच्या
अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः ।
दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १६, श्लोक १
यांसारख्या काही श्लोकांच्या जपाने दुर्धर सिद्धी प्राप्त होतात. पठणाने परम गती प्राप्त होते.
अध्याय क्र. १७
या अध्यायाच्या पठणाने इंद्राप्रमाणे तेजस्वी रूप प्राप्त होते, संकटांपासून मुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्ती होते.
अध्याय क्र. १८
या अध्यायाचे माहात्म्य वेदांपेक्षाही उत्तम आहे. हे सर्व शास्त्रांचे सार आहे. अमृताप्रमाणे आहे, तसेच संसारातील यातना छिन्नविछिन्न करणारे आहे. अविद्येचा नाश करणारे आहे. हे भगवान श्रीविष्णूचे चैतन्य आणि सर्वश्रेष्ठ परम पद आहे. याच्या पठणाने यमदूतांची गर्जना बंद होते.’
संकलन : दिलीप तारळेकर
(संदर्भ :‘हरि विजय’, दीपावली २०११)