‘आता तुमचे हिंदुत्व कुठे गेले ?’ – गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शिवसेनेचा प्रश्‍न

गोव्यात गोमांसाचा तुटवडा दूर करण्यासाठी भाजप शासनाने अल्पसंख्यांकांची मागणी मान्य केल्याचे प्रकरण !

जितेश कामत

पणजी, २३ डिसेंबर (वार्ता.) – कर्नाटक शासनाने गोहत्या बंदी विधेयक विधानसभेत संमत केल्यानंतर गोव्यात गोमांसाचा तुटवडा भासत आहे. गोव्यातील चर्च संस्था, गोमांस विक्रेते, तसेच सत्ताधारी आणि विरोधी आमदार यांनी गोव्यातील गोमांसाचा तुटवडा दूर करण्यासाठी शासनावर दबाव आणला आहे. या दबावाला बळी पडून गोवा शासनाने गोवा मांस प्रकल्पात परराज्यांतून अधिकृत मांसविक्रेत्यांना प्राणी आणण्याची अनुमती दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे गोवा विभागाचे प्रमुख जितेश कामत यांनी गोवा आणि महाराष्ट्र राज्य यांचे राज्यपाल या नात्याने पदभार सांभाळणारे माननीय भगतसिंह कोश्यारी यांना ‘आता तुमचे हिंदुत्व कुठे गेले?’, असा प्रश्‍न केला आहे.

जितेश कामत पुढे म्हणाले, ‘‘गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या गोमांसाचा तुटवडा दूर करण्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळे शिवसेनेला आश्‍चर्य वाटत आहे. कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्रातील मंदिरे भाविकांसाठी खुली न केल्याने राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. हिंदू गोमातेचे पूजन करतात. राज्यपाल कोश्यारी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ‘हिंदुत्वाचे’ धडे दिले पाहिजेत.’’

गोव्यात देहली येथून रेल्वेच्या माध्यमातून गोमांसाचा पुरवठा

पणजी – गोवा शासनाने गोवा मांस प्रकल्पात परराज्यांतून अधिकृत मांसविक्रेत्यांना प्राणी आणण्याची अनुमती दिली आहे. शासनाने ही अनुमती देण्याअगोदरच गोव्यातील मांसविक्रेत्यांनी देहली येथून गोव्यात गोमांस आणण्यास प्रारंभ केला आहे. देहली-गोवा राजधानी एक्सप्रेस आणि मंगला एक्सप्रेस या गाड्यांतून गोव्यात गोमांस आणणे चालू झाले आहे.

(म्हणे) ‘२४ डिसेंबरपर्यंत शासनाने गोव्यातील गोमांसाचा तुटवडा दूर करावा !’ – गोवा फॉरवर्ड

मडगाव – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नाताळच्या पूर्वी म्हणजे २४ डिसेंबरपर्यंत गोव्यातील गोमांसाचा तुटवडा दूर करावा, अशी मागणी ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. गोमंतकीय कुटुंबियांना नाताळ चांगल्या रितीने साजरा करता आला पाहिजे, यासाठी ही मागणी केल्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मुद्दामहून गोव्यात गोमांसाचा तुटवडा निर्माण करून ख्रिस्त्यांच्या नाताळच्या जेवणावर निर्बंध आणत असल्याचा आरोपही आमदार सरदेसाई यांनी केला आहे.