कणकवली – असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४३ व्या पुण्यतिथी महोत्सवास १७ डिसेंबरला प्रारंभ झाला होता. २१ डिसेंबर या महोत्सवाच्या मुख्य दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भावपूर्ण वातावरणात महोत्सवाची सांगता झाली. हा महोत्सव कोरोनाविषयीचे सर्व नियम पाळून भक्तांनी अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. परमहंस भालचंद्र महाराज यांचा जयघोष, विविध धार्मिक विधी यांमुळे गेले ५ दिवस भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. २१ डिसेंबर या दिवशी परमहंस भालचंद्र महाराज यांच्या मूर्तीवर सूर्याचे किरण आल्याने भाविकांना किरणोत्सवाचा लाभ घेता आला.
१७ ते २० डिसेंबर या कालावधीत प्रतिदिन पहाटे ५.३० वाजल्यापासून समाधीपूजन, काकड आरती, सर्व भक्तांच्या कल्याणार्थ धार्मिक विधी आणि भालचंद्र महारुद्र महाअभिषेक अनुष्ठान दुपारी आरती, भजने, सायंकाळी धुपारती, रात्री दैनंदिन आरती, असे कार्यक्रम झाले.
२१ डिसेंबर ४३ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे समाधीपूजन, काकड आरती, राजोपचार पूजा, किरणोत्सव आदी धार्मिक विधी झाले. सायंकाळी भालचंद्र संस्थान ते हनुमान मंदिर अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली. रात्री नित्यआरतीने या उत्सवाची सांगता झाली.