हॉटेल व्यावसायिकाकडून स्थानिकांना वागातोर समुद्रकिनार्‍यावर मज्जाव

पणजी – वागातोर येथील एका हॉटेल व्यावसायिकाने वागातोर समुद्रकिनार्‍याचे नाव ‘सनबर्न बीच’ असे ठेवण्यासमवेतच या समुद्रकिनार्‍यावर अंजुना, कायसुव आणि वागातोर येथील स्थानिक नागरिकांना प्रवेश नाकारला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ओझरन या ठिकाणी या हॉटेल व्यावसायिकाने गुंड (बाऊन्सर) ठेवले असून स्थानिकांची समुद्रकिनारी जाण्याची पारंपरिक वाट अडवून त्यांना समुद्रकिनार्‍यावर येण्यास प्रतिबंध केला जात आहे. याउलट परप्रांतीय या ठिकाणी येऊन अनधिकृत गोष्टी करत असूनही त्यांना येथील प्रशासन रोखत नाही. या गोष्टीला स्थानिक ग्रामस्थ विरोध दर्शवणार असून पोलीस आणि ग्रामपंचायत यांना समुद्रकिनार्‍याचे नामांतर न करण्याविषयी निवेदन देेणार आहे.

स्थानिक ग्रामस्थांचा या समुद्रकिनार्‍यावर पहिला अधिकार आहे. त्यांना तेथे जाण्यापासून किंवा फिरण्यास रोखण्यात आले आणि या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झाले, तर येथील युवक कायदा हातात घेतील अन् त्याला पूर्णतः शासन उत्तरदायी असेल, अशी चेतावणी गोवा फॉरवर्डचे आमदार विनोद पालयेकर यांनी दिली आहे.