उघड्यावरील मांस विक्रीमुळे बालिकेला जीव गमवावा लागला !
नंदुरबार नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांना निवेदन
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?
नंदुरबार, ९ डिसेंबर (वार्ता.) – शहरात सर्रास उघड्यावर मांस विक्री होत असल्याने पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या वाढून ते थेट नागरिकांवर आक्रमण करत आहेत. अशाच एका पिसाळलेल्या कुत्र्याने वीर सावरकर नगर येथील पाच वर्षीय कु. हिताक्षी मुकेश माळी हिचा चावा घेतल्याने तिचा उपचाराच्या वेळी मृत्यू झाला. कामात कुचराई करणार्या संबंधित स्वच्छता ठेकेदाराचा ठेका रहित करावा, मांस विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून उघड्यावरील मांस विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी. १३ डिसेंबरपर्यंत कारवाई न झाल्यास १४ डिसेंबरपासून नगरपालिकेसमोर उपोषण केले जाईल, अशी चेतावणी हिंदु सेवा साहाय्य समितीने दिली आहे.
या संदर्भात नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. नंदुरबार शहरातील सर्वच चौकांमध्ये उघड्यावर मांस विक्री होत आहे. तसेच मांसापासून विविध पदार्थ बनवून विक्री करणार्या हातगाड्या चालवल्या जात आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील मांसाचे आणि हाडांचे तुकडे हे त्या परिसरातील कुत्रे खातात. त्यामुळे त्यांना ज्या दिवशी मांस मिळत नाही, त्या दिवशी ते थेट मनुष्य, डुक्कर यांवर आक्रमण करतात.
२. शहरातील प्रत्येक वसाहतीमध्ये मोकाट कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
३. नंदुरबार नगरपरिषदेच्या नोंदीप्रमाणे उघड्यावर मांस विक्री करणारे दुकान आणि तत्सम पदार्थ बनवून विक्री करणारे गाडे यांना नगरपालिकेने अनुमती दिलेली नाही. याचाच अर्थ ही सर्व दुकाने अनधिकृत आहेत. या अनधिकृत दुकानांवर तात्काळ कारवाई करून त्यांना कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, मृत्यूमुखी पडलेली निष्पाप बालिका हिताक्षी माळी हिच्या मृत्यूला उत्तरदायी असलेल्या ठेकेदाराचा ठेका रहित करण्यात यावा, मोकाट कुत्र्यांना ‘रॅबीज इंजेक्शन’ देण्याचा आणि त्यांच्या ‘नसबंदी’चा कार्यक्रम त्वरित राबवण्यात यावा, गुरांप्रमाणेच मोकाट कुत्र्यांसाठीही कोंडवाडा सिद्ध करावा.
या मागण्या १३ डिसेंबरपर्यंत पूर्ण न झाल्यास १४ डिसेंबरपासून नंदुरबार नगर परिषदेसमोर उपोषण करण्याची चेतावणी समितीच्या वतीने देण्यात आली. निवेदनावर धर्मसेवक डॉ. नरेंद्र पाटील, मृत बालिकेचे वडील श्री. मुकेश माळी, काका श्री. राजेश महाजन, सर्वश्री चेतन राजपूत, धर्मसेवक मयुर चौधरी, जितेंद्र राजपूत, कपिल चौधरी, जितेंद्र मराठे, गौरव धामणे, कुणाल शिंपी यांच्या स्वाक्षर्या आहेत.