शेतकर्‍यांच्या मागण्यांना पाठिंबा; मात्र बंदमध्ये व्यापारी सहभागी नाही ! – अतुल शहा, व्यापारी महासंघ

सांगली, ७ डिसेंबर (वार्ता.) – कोरोना काळात तीन मासांपेक्षा अधिक काळ व्यवसाय बंद असल्याने अगोदरच व्यापारी अडचणीत आहेत. त्यात सरकारकडून कोणतेही साहाय्य मिळालेले नाही. अगोदरच बाजारपेठ अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. अशा परिस्थितीत आता आणखी एक बंद व्यापार्‍यांना परवडणारा नाही. शेतकर्‍यांच्या मागण्यांना आमचा १०० टक्के पाठिंबा आहे; मात्र बंदमध्ये व्यापारी सहभागी नाहीत, असे व्यापारी संघाचे श्री. अतुल शहा यांनी कळवले आहे.

श्री. अतुल शहा यांनी पुढे म्हटले आहे की, आजपर्यंत कुठल्याच सरकारने शेतकरी हिताचा विचार केलेला दिसून येत नाही. आज या देशाचा अन्नदाता प्रचंड अडचणीत आहे आणि त्यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांना समृद्ध बनवणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मागण्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे.