‘सरकार स्थिर रहावे’, असे वाटत असल्यास काँग्रेस नेतृत्वावर बोलणे टाळावे ! – अधिवक्त्या यशोमती ठाकूर, महिला आणि बाल विकासमंत्री

मुंबई – आघाडीमधील काही नेत्यांच्या काही मुलाखती आणि लेख माझ्या निदर्शनास आले आहेत. काँग्रेसची कार्याध्यक्ष म्हणून मी आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की, हे सरकार स्थिर रहावे, असे वाटत असेल, तर काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका-टिप्पणी करणे टाळावे, असे सूचक ‘ट्वीट’ काँग्रेसच्या नेत्या आणि महिला अन् बाल विकासमंत्री अधिवक्त्या यशोमती ठाकूर यांनी केले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘राहुल गांधी यांच्यामध्ये थोडासा सातत्याचा अभाव आहे’, असे विधान केले होते. यावरून अधिवक्त्या अशोमती ठाकूर यांनी असंतोष व्यक्त केला आहे. त्यांनी ‘ट्वीट’मध्ये म्हटले आहे की, ‘आघाडी धर्माचे पालन सर्वांनी करावे. काँग्रेसचे नेतृत्व अतिशय स्थिर आहे. निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे.’