योग्य पद्धतीने मतदानही करू न शकणार्या मतदारांना शिक्षित म्हणायचे का ?
पुणे, ४ डिसेंबर – उच्चशिक्षित असलेल्या पदवीधर मतदारसंघात अवैध म्हणजेच बाद झालेल्या मतांचा आकडाही मोठा आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात २३ सहस्र ९२ मते अवैध ठरली, तर पुणे पदवीधर मतदारसंघात १९ सहस्र ४२८ मते अवैध ठरली. पदवीधर निवडणुकीत मतदान करतांना मतपत्रिकेसमवेत पुरवण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या ‘स्केचपेन’ने मत नोंदवावे लागते. पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या पुढे रकान्यात १ अंक लिहून मत नोंदवावे लागते. यात अनेक मतदारांनी पसंती क्रमांकाऐवजी ‘बरोबर’ असे चिन्ह केले होते, काहींनी ‘रोमन’ अंकात पसंती क्रमांक दिला होता, काहींनी १ क्रमांक योग्यप्रकारे काढला नव्हता, तर काहींनी क्रमांक रकान्याच्या बाहेर टाकला होता. यामुळे या सर्वांची मते अवैध झाली. (पदवीधर असणार्या आणि सुशिक्षित म्हणवून घेणार्या मतदारांना जर योग्य पद्धतीने मतदानही करता येत नसेल, तर यापेक्षा लज्जास्पद ते काय ! – संपादक)
यातील आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे टपाली मतदानामध्येही मते बाद होण्याचे प्रमाण होते. संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात टपाली मतांमध्ये १७५ मते अवैध ठरली. काहींनी मतपत्रिकेवर मतदारांच्या मागण्या, घोषणा लिहून ठेवल्या होत्या. यातील बहुतांश मतदार हे नवखे असल्याने राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोग यांनी योग्य प्रकारे मार्गदर्शन केले नाही, असे काही मतदारांनी सांगितले.