पुणे – भाईचंद हिराचंद रायसोनी (बी.एच्.आर्.) पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करून अनेक पुरावे शासनाधीन केले आहेत. या पथकाने जळगाव येथील बी.एच्.आर्.च्या संचालक आणि पदाधिकारी यांच्या घरांवर २७ नोव्हेंबर या दिवशी सकाळी एकाच वेळी धाडी घातल्या होत्या. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे संभाजीनगरसह अन्य ठिकाणीही झडती घेण्यात आली होती. यात अनुमाने १ सहस्र १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींकडे तहसीलदारांसह विविध सरकारी अधिकार्यांचे १०० हून अधिक बनावट शिक्के आढळून आले आहेत.
महत्त्वाची कागदपत्रे, शपथपत्रे, ठेवीदारांच्या पावत्या, भ्रमणसंगणकासह अन्य साहित्य पोलिसांच्या हाती लागले असून पोलिसांकडून या कागदपत्रांची पडताळणी चालू आहे. या कारवाईमध्ये २ पोलीस उपायुक्त, ४ साहाय्यक पोलीस आयुक्त, २५ पोलीस निरीक्षक, २५ साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि १०० पोलीस यांचा सहभाग होता. जितेन्द्र कंडारे याला सर्व व्यवहारांची माहिती असल्याने पोलीस त्याचा आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.