म्हादई नदीच्या उपनद्यांचे अस्तित्व धोक्यात : शासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी

डिचोली, ३० नोव्हेंबर (वार्ता.) –  म्हादई आणि तिच्या उपनद्या गोव्यातील लोकांच्या जगण्याचा आधार बनल्या आहेत. कर्नाटकातील कळसा, भंडुरा, हलतरा, तसेच इरती, बैल, मुदूरहल, पानशेरा या उपनद्यांच्या अस्तित्वावर धरणांच्या साखळीने घाला घातला जाणार आहे. नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण करण्याचे उत्तरदायित्व कुणी पार पाडतांना दिसत नाही. त्यामुळे भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. विविध कारणांमुळे सत्तरीतील डोंगुर्ली ठाणे पंचायत क्षेत्रातील कोत्राची नदी, सांखळी परिसरातील वाळवंटी नदी आणि तळेखोल येथून चालू होणारी डिचोली नदी, नगरगाव-नानोडा, तांबडी सुर्ल, गुळेली परिसरातील रगाडो, तसेच दूधसागर या नद्या रेतीउपसा, कचरा, दगड, गाळ, सांडपाणी आणि अन्य काही घटक पात्रात सोडल्याने, तसेच पात्रांवर अतिक्रमण झाल्याने अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत. सत्तरीत काही वर्षांपासून सातत्याने जंगलतोड होत आहे. शेती बागायती, घरे यांचे नदीपात्रात अतिक्रमण होत आहे. यामुळे नद्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या उपनद्यांकडे वेळीच लक्ष पुरवले असते, तर आज त्यांची ही दुरावस्था झाली नसती. गोव्यातील १२ पैकी ६ तालुक्यांतून म्हादई नदी वहात असून या नदीतील पाणी अल्प झाले, तर त्याचे भीषण परिणाम होतील.

प्रमुख नदी आणि उपनद्या यांचे संरक्षण ही काळाची आवश्यकता !  राजेंद्र केरकर

राज्यातील प्रमुख नद्या आणि उपनद्या यांचे संरक्षण ही काळाची आवश्यकता आहे, असे मत गोव्यातील पर्यावरण तज्ञ राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले, ‘‘मान्सूनचा पाऊस ४ महिने कोसळला की, म्हादई नदीचे पात्र दुथडी भरून वहात असते. जंगलतोडीमुळे जमिनीची धूप होऊन गढूळ पाण्याचे प्रमाण प्रतिवर्षी वाढत आहे. म्हादईचा महत्त्वाचा स्रोत चोर्ला-कर्नाटक येथील कळसा नाला आहे. कर्नाटकच्या महाकाय कालव्यामुळे कळसाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. म्हादईच्या पात्राला येऊन मिळणार्‍या इरती, बैल, भंडुरा, हलतरा आदी ठिकाणच्या नाल्यांची स्थिती बिकट आहे. या कारणांमुळे काही वर्षांपासून म्हादईच्या पात्रातील पाणी हिवाळ्यात अल्प होत आहे.’’

कर्नाटकच्या जलस्रोतमंत्र्यांनी म्हादईविषयी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेला आरोप फेटाळला

पणजी, ३० नोव्हेंबर (वार्ता.)  कर्नाटकचे जलस्रोतमंत्री रमेश जारकीहोली यांनी ‘कर्नाटकने अवैधपणे म्हादईचे पाणी वळवले असून यामुळे गोव्यातील म्हादईच्या पाण्याच्या पातळीमध्ये घट झाली आहे’, हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेला आरोप फेटाळला आहे. डेक्कन हेराल्डला त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांचा आरोप सिद्ध करून दाखवावा. हा आरोप खरा असेल, तर मी मंत्रीपदाचा त्याग करीन. डॉ. प्रमोद सावंत राजकीय लाभासाठी हा दावा करत आहेत.