कुडाळ – मुलींना पळवून नेल्याच्या २ प्रकरणांत कुडाळ तालुक्यातील एक आणि शेर्ले, सावंतवाडी येथील एक, अशा २ युवकांना पोलिसांनी कह्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कुडाळ – तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी संशयित आरोपी संभाजी अशोक राणे (राणेवाडी, डिगस) याला पोलिसांनी कह्यात घेतले. संभाजी राणे यांच्या वडिलांचे ३ दिवसांपूर्वी निधन झाले. १३ नोव्हेंबरपासून तो बेपत्ता होता; मात्र वडिलांच्या दिवसकार्यासाठी तो घरी आला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी पहाटे घरी जाऊन त्याला कह्यात घेतले. राणे याने अपहृत मुलगी सावंतवाडी शहरात असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सावंतवाडी येथे जाऊन मुलीलाही कह्यात घेऊन कुडाळ पोलीस ठाण्यात आणले. या वेळी मुलीकडे पोलिसांनी चौकशी केली, तसेच राणे याने मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी राणे याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद केला.
सावंतवाडी – तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी शेर्ले येथील एका युवकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केला आहे. २९ नोव्हेंबरला संध्याकाळी युवकाने मुलीला पळवून नेले. आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही कह्यात घेतले आहे.