भारतीय संस्कृती जगाला विश्‍वशांतीचा मार्ग दाखवील ! – इंद्रेश कुमार, अध्यक्ष, मुस्लिम राष्ट्रीय मंच

२५ वी ऑनलाईन तत्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला

इंद्रेश कुमार, अध्यक्ष, मुस्लिम राष्ट्रीय मंच

पुणे – ईश्‍वरभक्ती ही मानवाच्या हितासाठी आहे. दुसर्‍यांना साहाय्य करून त्यांचे कष्ट अल्प करणे, हीच भारतीय संस्कृती आहे. आता हीच संस्कृती देशाला विश्‍व गुरू बनवून जगाला विश्‍वशांतीचा मार्ग दाखवील, असे मत मुस्लिम राष्ट्र्रीय मंचाचे अध्यक्ष इंद्रेश कुमार यांनी मांडले. एम्आयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्‍व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, आणि संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनाच्या अंतर्गत २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या २५ व्या ऑनलाईन तत्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.

याप्रसंगी आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक आणि कार्याध्यक्ष डॉ. बालाजी तांबे, जीवन विद्या मिशनचे विश्‍वस्त प्रल्हाद वामनराव पै, जगप्रसिद्ध संगणतकतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, नागपूर विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण आदी उपस्थित होते.

डॉ. बालाजी तांबे म्हणाले, श्रद्धा ही सर्वांत मोठी गोष्ट आहे. ईश्‍वरावरील श्रद्धा न्यून होत गेली, तर हळू हळू अन्य सर्व गोष्टींवरील श्रद्धा संपुष्टात येते आणि हेच मानवाच्या दुःखाचे सर्वांत मोठे कारण आहे.

या प्रसंगी डॉ. विजय भटकर म्हणाले, श्रीराम हे भारतीय संस्कृतीचा पाया आहेत. त्यांच्याच नावाने अयोध्या येथे उभारण्यात येत असलेले श्रीराम मंदिर हे ज्ञानमंदिर व्हावे, याप्रमाणे त्याची रचना करावी.

हिंदू-मुसलमान तणाव न्यून करण्यासाठी संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम आणि संत एकनाथ महाराज अशा संतांनी दिलेल्या सांप्रदायिक सद्भावाचा संदेश रूजविणे आवश्यक असल्याचे मत डॉ. एन.एन. पठाण यांनी व्यक्त केले.