देहलीत शिवशक्ती मंदिरातील १२ हून अधिक मूर्तींची तोडफोड

देहलीतील पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतांना अशा प्रकारच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

देहली – येथील कैलाश विहार पंसारी भागात शिवशक्ती मंदिरामध्ये तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. या मंदिरातील १२ हून अधिक मूर्ती तोडण्यात आल्या. या मूर्तींचे शिर तोडण्यात आले आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. या घटनेविषयी विश्‍व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता विनोद बंसल यांनी, ‘हिंदूंच्या सहिष्णुतेची कुणी परीक्षा घेऊ नये’, अशी चेतावणी दिली आहे.
याविषयी मंदिराचे विश्‍वस्त विभूती शर्मा यांनी सांगितले की, २५ नोव्हेंबरच्या सकाळी आम्हाला ही घटना स्वच्छता कर्मचार्‍याने सांगितली. मंदिरामध्ये लक्ष्मी-नारायण, कृष्ण-राधिका, श्री दुर्गादेवी, श्री बगलामुखीदेवी आणि शिव परिवार यांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली. याविषयी पोलीस आणि प्रशासन यांना कळवण्यात आले आहे. प्रशासनाने सांगितले की, त्यांना नवीन मूर्ती देण्यात येतील. येथील सीसीटीव्हीचे केंद्र ३-४ दिवसांपूर्वीच तोडण्यात आल्याचेही लक्षात आले आहे. २४ नोव्हेंबरच्या रात्री मंदिराचे दार बंद करण्याचे राहिल्याने ही घटना घडली. (दार बंद करायचे राहिले की मुद्दामहून बंद केले नाही, याचीही चौकशी करण्यात यावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी. – संपादक)