गोव्याच्या पर्यटन धोरणाला चर्च संस्थेचा विरोध

पर्यटन धोरण स्थगित ठेवण्याची मागणी

पणजी, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – राज्याचे पर्यटन धोरण हे गोवा आणि गोमंतकीय यांच्या हितासाठी नाही. हे पर्यटन धोरण स्थगित ठेवावे, अशी मागणी चर्च संस्थेशी निगडित ‘सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल टुरिझम्’ने (सी.आर्.टी.ने) गोवा शासनाकडे केली आहे. गोवा शासनाने मागील मासात ‘गोवा पर्यटन धोरण २०२०’ला मान्यता दिली आहे. या धोरणात राज्यातील पर्यटनक्षेत्र विकसित करण्यासाठी राज्य पर्यटन मंडळ स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

‘सी.आर्.टी.’चे कार्यकारी सचिव फादर फ्रेडी ब्रागांझा म्हणाले, ‘‘गोवा पर्यटन धोरणाचा गोव्याला कोणताच लाभ होणार नाही. हे धोरण सिद्ध करतांना राज्याला भेट देणार्‍या देशी आणि विदेशी पर्यटकांच्या वस्तूनिष्ठ संख्येचा विचार झालेला नाही. हे धोरण म्हणजे ‘गोवा पर्यटन मंडळ’ स्थापन करून त्या ठिकाणी गोवा पर्यटन विकासनिधी वळवण्याचा गुप्त हेतू आहे. धोरणाद्वारे सार्वजनिक संसाधनांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न आहे.’’ ‘सी.आर्.टी.’ने पर्यटन धोरणाला अनुसरून ‘पीपल्स सिटीझन चार्टर’ आणि ‘पीपल्स ओव्हर प्राफीट्स’ या नावांनी प्रस्ताव अन् सूचना पर्यटन खात्याला सुपुर्द केल्या आहेत.