महाराष्ट्रात लाचखोरी आणि इतर भ्रष्टाचाराचे सर्वाधिक प्रलंबित खटले पुण्यात

आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण अल्प

पुणे – राज्यात सर्वाधिक प्रलंबित खटल्यांची संख्या पुणे विभागात आहे. लाचखोरी आणि इतर भ्रष्टाचाराचे खटले पुणे, नागपूर आणि ठाणे या विभागांत सर्वाधिक प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे विभागात १ सहस्र ५३ खटले प्रलंबित आहेत. त्यानंतर नागपूर विभागात ८६१, ठाणे विभागात ८५६ खटले प्रलंबित आहेत. सर्वांत अल्प प्रलंबित खटले मुंबई विभागात असून या ठिकाणी २५७ खटले प्रलंबित आहेत. संपूर्ण राज्यात सप्टेंबर अखेरपर्यंत ६ सहस्र ५५ खटले प्रलंबित असून, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर न्यायालयातील कामकाज अल्प क्षमतेने चालू असल्याने प्रलंबित खटले वाढत आहेत. आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण अल्प असून याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

या वर्षी लाचखोरीच्या गुन्ह्यात गेल्या वर्षीपेक्षा २७ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले. ही घट दळणवळण बंदीमध्ये झाल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या ७ मासांपासून काम ठप्प आहे. सध्या तातडीच्या प्रकरणांवरच सुनावणी होत असल्यामुळे प्रलंबित खटले वाढत आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत अशीच स्थिती राहील, असे ज्येष्ठ विधीज्ञ अधिवक्ता प्रताप परदेशी यांनी सांगितले. (गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण अल्प असल्यामुळे त्यांना कायद्याचा धाक राहिला नाही. यावर सरकारने तात्काळ उपाययोजना काढावी, ही अपेक्षा ! – संपादक)