पणजी – कोरोनाच्या पश्चात उद्भवणार्या समस्यांवर मात करण्यासाठी आयुर्वेद, योग आणि तत्सम उपाचारपद्धती यांचा जगाला मोठा हातभार लागत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी केले आहे. ‘कोरोनानंतर आरोग्य आणि मानवता यांचा समाजावरील परिणाम’ या विषयावरील एका आंतरराष्ट्रीय वेब परिषदेला केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक ‘व्हर्च्युएल’ माध्यमातून संबोधित करत होते.
आयुषमंत्री श्रीपाद नाईक पुढे म्हणाले, ‘‘यापुढे कोरोना महामारीसारख्या समस्यांना समोरे जाण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर द्यावा लागणार आहे. आयुर्वेद आणि इतर पारंपरिक उपचारपद्धती आरोग्य सुदृढ ठेवणे अन् रोगनिवारण करणे, यांसाठी सर्वसमावेशक मार्ग अवलंबत असतात. या उपचारपद्धतींचा अल्प खर्चात उत्तम लाभ मिळत असतो. या उपचारपद्धतींमध्ये महामारीनंतर उद्भवणार्या मानसिक आणि भावनिक समस्यांवर मात करण्याची क्षमता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, कुटुंब कल्याण आणि आयुष मंत्रालय यांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केलेल्या राष्ट्रीय उपचारपद्धतींमध्ये आयुर्वेदाचाही समावेश करण्यात आला आहे.’’