आज थोरले बाजीराव पेशवे स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !
थोरले बाजीराव हे जगातील मोजक्या अपराजित सेनापतींपैकी एक ! त्यांना ‘पहिले बाजीराव’ या नावानेही ओळखले जाते. रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावांनी स्वतःच्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापिलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. थोरले बाजीराव पेशवे हे ६ फुट उंचीचे होते, असा इतिहासात उल्लेख आहे. भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबुस गौरवर्ण, निकोप प्रकृती; कुणीही मोहित व्हावे, असा मोहक चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तीमत्त्व असल्याने त्यांची कुणावरही सहज छाप पडे. भपकेबाज पोशाखाचा त्यांना तिटकारा होता. स्वत: बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरत. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करण्यावर त्यांचा भर होता, नोकराविना त्यांचे काही अडत नसे. त्यांचे निळा, गंगा, सारंगा आणि अबलख या नावांचे ४ खासगी घोडे होते. त्या घोड्यांचे दाणावैरण-पाणी ते स्वत: बघत. त्यांचे उभे सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत सिद्ध झाले होते. उण्यापुर्या ४० वर्षांच्या आयुष्यात थोरले बाजीराव यांनी अतुल पराक्रम गाजवला.
वर्ष १७२० मध्ये पेशवाई त्यांच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी २० वर्षांत अनेक लढाया केल्या. त्यात माळवा (डिसेंबर १७२३), धर (वर्ष १७२४), औरंगाबाद (वर्ष १७२४), पालखेड (फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद (कर्णावती) (वर्ष १७३१), उदयपूर (वर्ष १७३६), फिरोजाबाद (वर्ष १७३७), देहली (वर्ष १७३७), भोपाळ (वर्ष १७३८), वसईची लढाई (१७ मे १७३९) या आणि अशाच ३६ मोठ्या लढायांचा समावेश आहे. थोरले बाजीराव पेशवे सगळ्याच लढाया जिंकले आहेत. एकदाही पराभूत न झालेले जगाच्या इतिहासातील ते एकमेव सेनापती आहेत.
– श्री. संजीव वेलणकर
(साभार : ‘मराठीसृष्टी’ संकेतस्थळ )