मालवण – कोरोनाची दुसरी लाट कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे; मात्र या चेतावणीकडे जिल्हा प्रशासन आणि मालवण नगरपालिका प्रशासन पूर्णतः दुर्लक्ष करत असून मालवण येथे मोठ्या संख्येने येणार्या पर्यटकांची कोणत्याही प्रकारची आरोग्यतपासणी केली जात नाही. या प्रकाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट कोणत्याही क्षणी येण्याची भीती माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, ‘‘मुंबईसह देहली येथे मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण मिळत आहेत. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांनी सुरक्षिततेसाठी गोव्याचा आश्रय घेतला असून या ठिकाणचे अनेक पर्यटकही सिंधुदुर्गात येऊ लागले आहेत. या पर्यटकांची मालवण शहराच्या सीमेवर ‘रॅपिड टेस्ट’ होणे अत्यावश्यक आहे. येणारे पर्यटक आरोग्याची कोणत्याही प्रकारची काळजी घेत नाहीत. मास्क लावत नाहीत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत.’’