वैद्यकीय उपचार करतांना अध्यात्मशास्त्र अंतर्भूत केल्यास रोगाचे निदान आणि उपचार अधिक प्रभावीपणे करणे शक्य ! – डॉ. (सौ.) ज्योती खोदनापूर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘वैद्यकीय क्षेत्रात अध्यात्मशास्त्र अंतर्भूत करणे’ या विषयावर ‘वेबिनार’

बेळगाव – आध्यात्मिक बळ असेल, तर सूक्ष्म ज्ञान विकसित होते. त्यामुळे रोगाचे मूळ काय, याचे निदान करणे आणि योग्य उपचार करणे शक्य होते. त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांनीच वैद्यकीय उपचार करतांना अध्यात्मशास्त्र अंतर्भूत केल्यास रोगाचे निदान आणि उपचार अधिक प्रभावीपणे करता येतील, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या डॉ. (सौ.) ज्योती खोदनापूर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकताच ‘वैद्यकीय क्षेत्रात अध्यात्मशास्त्र अंतर्भूत करणे’ (इंटेग्रेटींग स्पिरिच्युअ‍ॅलिटी विथ मेडिसीन) या विषयावर ‘वेबिनार’ (ऑनलाईन कार्यक्रम) आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाला कर्नाटक राज्यातून १६८ डॉक्टर ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते, तसेच ‘यू ट्यूब’वरून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ३६३ जणांनी पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्या (कु.) रंजिता दानाप्पागौडर यांनी केले.

आपल्या मार्गदर्शनात डॉ. (सौ.) ज्योती खोदनापूर यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’चे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांचा साधनेतील प्रवास आणि त्यांनी केलेले आध्यात्मिक संशोधन यांविषयी माहिती दिली.

डॉ. (सौ.) ज्योती खोदनापूर

डॉ. (सौ.) ज्योती खोदनापूर पुढे म्हणाल्या की,

१. सध्याच्या वैद्यकीय शिक्षणात आध्यात्मिक दृष्टीकोनांचा अभाव दिसतो. काळाच्या ओघात वैद्यकीय क्षेत्राचे बाजारीकरण झाल्यामुळे आध्यात्मिक दृष्टीकोन लोप पावत चालल्याचे दिसत आहे. रोगाचे निदान करतांना अनेक वेळा अडथळे येतात, याचाही आपल्याला अनुभव येतो. रोगाचे निदान करतांना येत असलेल्या अडथळ्यांमागे आध्यात्मिक कारण आहे का, याचा विचार केला पाहिजे.

२. आता तर जागतिक आरोग्य संघटनाही तेच सांगत आहे. एखादा रुग्ण शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक अशा सर्वच स्तरांवर स्वस्थ असेल, तरच तो पूर्ण स्वस्थ आहे, असे म्हणू शकतो. हे लक्षात घेऊन आधुनिक वैद्यांनी (डॉक्टरांनी) आध्यात्मिक बळ आणि सूक्ष्मातील ज्ञान विकसित करणे आवश्यक आहे.

३. ‘शरीरे जर्जरीभूते व्याधिग्रस्ते कलेवरे । औषधं जाह्नवीतोयं वैद्यो नारायणो हरिः ॥’

अर्थ : शरीर व्याधींनी जर्जर झाले असता गंगोदक हेच खरे औषध आणि भगवान विष्णु हाच खरा वैद्य होय.

हे आपल्या सर्वांना ऐकून आणि वाचून ठाऊक आहे. पूर्वी रुग्णांना तपासतांना नुसते शारीरिक आणि मानसिक लक्षणांवरच नव्हे, तर ‘त्या मागे दैवी कारण आहे का ?’, याचा विचार करून उपचार केले जात असत.

‘कर्मजा व्याधय: केचित् दोषजा सन्ति चापरे ।’

अर्थ : काही व्याधी कर्मामुळे, तर अन्य व्याधी दोषांमुळे उत्पन्न होतात.

सुश्रुतसंहितेमध्येही चिकित्सा आणि शल्यचिकित्सा यांवर हा एक प्राचीन संस्कृतपाठ आहे, ज्याचा अर्थ असा आहे की, व्याधीचे ३ प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात भाग्य-कर्मामुळे म्हणजे पूर्वजन्मांतील आणि या जन्मातील कर्मांमुळे व्याधी होते, दुसर्‍या प्रकारात वात, पित्त आणि कफ यांमध्ये असलेल्या असंतुलनामुळे व्याधी होते, तर तिसर्‍या प्रकारची व्याधी ही या दोन्ही कारणांमुळे एकत्रित म्हणजे काही प्रमाणात भाग्यामुळे अन् काही प्रमाणात शारीरिक असते. त्यामुळे रुग्णाला असणारा आजार हा शारीरिक, मानसिक कि आध्यात्मिक आहे (प्रारब्धामुळे किंवा अयोग्य कर्मामुळे आहे) ? याचे निदान करून त्याप्रमाणे त्यावर उपचार किंवा उपाय केले जात असत.

४. सध्या संपूर्ण जगातील वैद्यकीय क्षेत्रात अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करण्याचा कल वाढतांना दिसत आहे. वर्ष १९९२ मध्ये १२६ मान्यताप्राप्त अमेरिकी वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एकाच वैद्यकीय महाविद्यालयात ‘आध्यात्मिकता आणि चिकित्सा’ यांवर अभ्यासक्रम चालू होता. त्यानंतर वर्ष २०१४ ची संख्या पाहिली, तर १४७ मान्यता प्राप्त अमेरिकी वैद्यकीय महाविद्यालयांत हा अभ्यासक्रम चालू केला आहे. एवढेच नव्हे, तर ‘धर्म, आध्यात्मिकता आणि स्वास्थ्य’ या विषयांवरील लेख प्रसिद्ध होण्याची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. याचाच अर्थ वैद्यकीय क्षेत्रातही धर्म आणि अध्यात्म यांविषयी रुची वाढत चालली आहे, असेच म्हणावे लागेल.

वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे

अ. ‘वैद्यकीय उपचाराचे आध्यात्मिक संशोधन’ या विषयावर माहिती सांगितल्यावर डॉ. रंगनाथ नायक यांनी ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या (एस्.एस्.आर्.एफ्.च्या) संकेतस्थळाविषयी माहिती विचारून घेतली. या वेळी डॉ. नायक यांनी सांगितले की, गेल्या १० वर्षांपासून मी स्वतः विविध नामजपादी उपचार वैद्यकीय उपचारांमध्ये अंतर्भूत केले आहेत.

आ. शंकानिरसन सत्र चालू असतांना एका डॉक्टरांनी स्वत: केलेले प्रयत्न सांगितले. ते करत असलेली कुलदेवतेची उपासना आणि अन्य त्रासांच्या निवारणासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाचा त्यांच्या व्यवसायात होत असलेला लाभ त्यांनी या वेळी सांगितला.

‘वेबिनार’ चालू असतांना आणि झाल्यावर डॉक्टरांनी व्यक्त केलेले काही अभिप्राय

१. डॉ. रंगनाथ नायक : डॉ. ज्योती खोदनापूर या अत्यंत सरळ आणि सुलभ भाषेत माहिती सांगत होत्या. त्यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन !

२. डॉ. सुमन कुलकर्णी : असे आध्यात्मिक संशोधन असलेले कार्यक्रम आणखी आयोजित करावेत.

३. डॉ. नागवेणी असपाली : असे ८ ते १० दिवसांचे प्रायोगिक शिबिर आयोजित करावे, ज्यात आम्हाला कृतीच्या स्तरावर नियोजन करता येईल, तसेच दैनंदिन कृतींचा आढावा घेता येईल. जेणेकरून आम्हाला या आध्यात्मिक ऊर्जेचा आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने लाभ होईल.

४. डॉ. समीरा : मी गेल्या ५ वर्षांपासून जाणीवपूर्वक अध्यात्मशास्त्राचे आचरण करत आहे. आजचा कार्यक्रम माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्र यांसाठी लाभदायक ठरेल, याची मला निश्‍चिती आहे.

५. डॉ. शारदा : अनेकदा डॉक्टरांना रुग्णांकडून येत असलेल्या नकारात्मक ऊर्जेला सामोरे जावे लागते. यामुळे अनेकदा त्यांना काही आध्यात्मिक त्रास झाला किंवा अकाली मृत्यू आला, असेही पहायला मिळते. अशा वेळी आत्मशक्ती प्रबळ ठेवणे, हे एक आव्हान असते. त्यामुळे हा ‘वेबिनार’ डॉक्टरांसाठी अत्यंत लाभदायी ठरेल.

या ‘वेबिनार’ला उपस्थित असलेल्यांपैकी ५३ जणांनी ऑनलाईन ‘अभिप्राय पत्रक’ भरले. त्यात ४३ जणांनी हा ‘वेबिनार अतिशय आवडला’ आणि ४२ जणांनी ‘आम्ही अशा वेबिनारसाठी नेहमी उपस्थित राहू’, असे नमूद केले होते.

वाचकांना विनंती : हा वेबिनार ‘यू ट्यूब’वर पहाण्यासाठी https://youtu.be/G3cpMG1w1sc या मार्गिकेवर उपलब्ध आहे.