मुंबई – देहलीमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. मुंबईतही परिस्थिती चिंताजनक होतांना दिसत आहे. पाच मासांनंतर मुंबईत रुग्णसंख्या वाढली असून, दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. करोनाच्या वाढत्या प्रसारामुळे सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा चालू करण्याच्या निर्णय आणखी लांबणीवर पडणार आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी एक मुलाखतीत बोलताना हे स्पष्ट केले आहे.
महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. चहल म्हणाले, मुंबईसाठी पुढील तीन ते चार आठवडे पुष्कळ महत्त्वाचे आहेत; मात्र मुंबईत कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू करण्यात येणार नाहीत. तीन ते चार आठवड्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल. जलतरण तलाव, शाळा आणि रेल्वे सेवा चालू करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले होते; मात्र आता या तिन्ही गोष्टी बंद रहातील. इतर ठिकाणावर सध्या कोणताही परिणाम होणार नाही.