मुंबई पुन्हा दळणवळण बंदीच्या उंबरठ्यावर ?

किशोरी पेडणेकर

मुंबई – मुंबई पुन्हा दळणवळण बंदीच्या उंबरठ्यावर आहे का ?, असा प्रश्‍न सध्या उपस्थित होत आहे. कारण कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढल्याने मुंबईकरांनी सावध राहावे, असे आवाहन करून १५ दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रहित करा, अशी मागणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. त्याचप्रमाणे आवश्यकता पडल्यास देहली-मुंबई रेल्वे सेवा आणि विमानसेवा बंद करण्याचा पर्याय असल्याचे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून मुंबई दळणवळण बंदीच्या उंबरठ्यावर जाऊ नये, यासाठी खबरदारीचे उपाय पालकमंत्री आणि महापौर यांनी सांगितले आहेत.

ज्याप्रमाणे देहली आणि गुजरात येथील रुग्ण वाढत आहेत, ते पाहता तेथील व्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे; मात्र मुंबई आणि महाराष्ट्र यांमधील रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. त्यामुळे रेल्वे, विमानसेवा बंद करायची किंवा त्या कशा चालवायच्या त्यासाठी नियमावली काय असेल, यावर विचार चालू आहे.

रेल्वेमधून येणार्‍या प्रवाशांनी आधीच आर्टीपीसीआर् पडताळणी करून मुंबईत यावे. त्यांना प्रवेश द्यायचा कि त्यांचे विलगिकरण करायचे याचा विचार चालू आहे. रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी टास्क फोर्स काम करत आहे. आवश्यकता लागली, तर कार्यपद्धती  घालू किंवा रेल्वे, विमानसेवा बंद करू, असे शेख यांनी सांगितले.