फरीदाबाद येथील ‘सनातन प्रभात’च्या वाचिका श्रीमती स्मिता बोस यांचा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याप्रतीचा भाव !

१. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सांगितलेला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करणे आणि नामजप केल्यानंतर घरातील वातावरणात आणि मनःस्थितीत चांगला पालट झाल्याचे अनुभवणे

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

‘श्रीमती स्मिता बोस या फरीदाबादमध्ये रहातात. त्या पाक्षिक हिंदी ‘सनातन प्रभात’च्या वाचिका आहेत. त्या नियमितपणे पाक्षिक हिंदी ‘सनातन प्रभात’ वाचतात. त्या काही सत्संगांत उपस्थित होत्या. जानेवारी २०२० मध्ये सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा फरीदाबाद येथे दौरा होता. त्या वेळी त्यांची सद्गुरु डॉ. पिंगळेकाकांशी भेट झाली. तेव्हा सद्गुरु पिंगळेकाकांनी त्यांना मार्गदर्शन करून ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करायला सांगितला. त्यांनी त्या क्षणापासून अधिकाधिक ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ असा नामजप करायला आरंभ केला. त्यांनी मला सांगितले, ‘‘मी नामजप करू लागल्यापासून घरातील वातावरणात आणि माझ्या मनःस्थितीत चांगला पालट झाला आहे. मी आनंदी असते.’’

२. दूरचित्रवाहिनीवरील श्रीकृष्णाच्या मालिकेतील श्रीकृष्णाला पाहून सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची आठवण येणे आणि ‘सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे श्रीकृष्ण आहेत’, असे जाणवणे

श्रीमती स्मिता बोस मला भ्रमणभाष करून त्यांच्या सद्गुरु पिंगळेकाकांशी झालेल्या भेटीविषयी भरभरून सांगतात. त्या वेळी त्यांची तृप्ती जोशी आणि मनीषा माहुर यांच्याशीही भेट झाली होती. त्या तृप्ती जोशी आणि मनीषा माहुर यांचेही क्षेमकुशल विचारतात. त्यांचा मला श्रीराम मंदिराच्या शिलान्यासाच्या दिवशी भ्रमणभाष आला होता. तेव्हा त्यांनी आमचे अभिनंदन केले आणि सांगितले, ‘‘मी सद्गुरु पिंगळेकाकांनी सांगितलेला नामजप गुरुमंत्रासारखा अखंड करत आहे. मी दूरचित्रवाहिनीवर श्रीकृष्णाची मालिका पहाते. तेव्हा त्या मालिकेतील श्रीकृष्णाला पाहून मला सद्गुरु पिंगळेकाकांची आठवण येते आणि ‘सद्गुरु पिंगळेकाका श्रीकृष्ण आहेत’, असे मला जाणवते.’’ त्या हे सांगतांना ‘त्यांची भावजागृती होत आहे’, असे मला जाणवले. मी त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही हा प्रसंग सद्गुरु पिंगळेकाकांना सांगता का ?’’ तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘सद्गुरु पिंगळेकाका सेवेत व्यस्त असतात. त्यामुळे त्यांचा वेळ घेणे मला योग्य वाटत नाही.’’ ‘त्या हेही आनंदाने सांगत आहेत’, असे मला वाटले.

३. ‘सद्गुरु पिंगळेकाकांशी झालेली भेेट’ हा त्यांच्यासाठी अमूल्य ठेवा असणे आणि त्याविषयी त्या पुनःपुन्हा सांगत असणे

त्यांच्याकडे ‘स्मार्टफोन’ नाही. त्यामुळे त्या ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकू शकत नाहीत. त्यांच्याकडे ‘सद्गुरु पिंगळेकाकांच्या भेटीचे स्मरण’, हाच एक अमूल्य ठेवा आहे. तो त्यांनी जीवापाड जपून ठेवला आहे. त्या त्याविषयी पुनःपुन्हा सांगत असतात.’

– सौ. संदीप कौर मुंजाल, फरीदाबाद (२२.८.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक