‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले श्रीमहाविष्णूचे अवतार आहेत’, असे सप्तर्षि, भृगु ॠषि आणि अत्रि ॠषि यांनी नाडीपट्ट्यांत लिहिले आहे. अनेक संतांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या अवतारत्वाविषयी सांगितले आहे, तर सप्तर्षींनी परात्पर गुरूदेवांना श्रीविष्णूचा ‘श्रीजयंतावतार’ असे म्हटले आहे. अशा जयंतावताराची वैशिष्ट्ये आणि त्याचे कार्य जाणून घेऊया.
१. अवताराची व्युत्पत्ती
भगवान श्रीमहाविष्णु पंचमहाभूतांची निर्मिती करतो. तो त्रिगुणांची निर्मिती करतो. तो पंचमहाभूते आणि त्रिगुण एकत्रित करून त्यातून सृष्टीची निर्मिती करतो. सृष्टीची निर्मिती झाल्यावर तो तिचे पालन, पोषण आणि संतुलन करत असतो. सृष्टी म्हणजे अनंतकोटी ब्रह्मांड, सप्तलोक, सप्तपाताळ, देवता, ॠषि, मानव, जीवराशी, कृष्णविवर, आकाशगंगा, सौरमंडल, पर्वत, अरण्य, नदी, समुद्र, भूमी इत्यादी. तो या सृष्टीला कालचक्रामध्ये बांधून ठेवतो. तो भूमीवर निसर्गाच्या माध्यमातून जीवराशींचे पालन करतो. श्रीमहाविष्णु देवता आणि ॠषि यांच्या माध्यमातून निसर्गाचे नियम घालून देतो. श्रीमहाविष्णु त्याच्यापासून उत्पन्न झालेल्या मानवाला पुन्हा त्याच्याकडे येण्याचा मार्ग दाखवतो आणि या मार्गालाच ‘धर्म’ म्हणतात. जेव्हा ‘धर्म’ कुंठित होतो आणि ‘अधर्म’ बळावतो, तेव्हा श्रीविष्णु वैकुंठ लोकातून पृथ्वीवर येतो. यालाच ‘अवतार’ म्हणतात.
२. अवताराचे कार्य
पूर्णावतार श्रीकृष्णात श्रीविष्णूचे तत्त्व १०० टक्के होते.
त्या श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले,
‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानाम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥’
भगवंत म्हणतो, ‘मी प्रत्येक युगात धर्मसंस्थापनेसाठी पुनःपुन्हा जन्म घेतो.’ आता कलियुगांतर्गत कलियुग या चक्रातून कलियुगांतर्गत सत्ययुगाकडे जात असतांना त्या संधीकालामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अवतार झाला आहे. भगवंताने हा अवतार ‘धर्मसंस्थापनेसाठी’च घेतला आहे, असे महर्षि सांगतात.
३. कलियुगातील श्रीविष्णूचा श्रीजयंतावतार
३ अ. मानवाचा अहंकार नष्ट करणे आणि ‘ईश्वरच सर्व काही करतो’ हे शिकवणे, यांसाठी श्रीविष्णूचा श्रीजयंतावतार झालेला असणे !
गेल्या २ सहस्र वर्षांमध्ये मानवाचा अहंकार पुष्कळ वाढला. त्याने स्वतःच्या सुखासाठी धर्माचे सर्व नियम तोडले. त्याने लोभामुळे भ्रष्टाचार केला, स्वत:च्या सुखासाठी इतरांमध्ये कलह लावले, स्वार्थासाठी निसर्गाचा नाश केला. मानवाला लोकेषणा असल्याने त्याने स्वतःची खोटी प्रतिमा सिद्ध केली. ‘विज्ञानाच्या साहाय्याने मी काहीही करू शकतो’, असा त्याच्यात अहंकार वाढल्याने मानवाने ईश्वराच्या अस्तित्वालाच धिक्कारले. हिटलरसारख्या नराधमाने लक्षावधी लोकांचा दुर्धर मृत्यू घडवून आणला. अमेरिका आदि राष्ट्रांनी युद्ध केले आणि मानव, तसेच भूमी यांनाही नष्ट करण्यासारखे परमाणू शस्त्र बनवलेे. अनेक राष्ट्रांवर संकटे ओढवली, सामान्य माणसाचा त्रागा झाला आणि भूदेवीच्या डोळ्यांत अश्रू आले.
तेव्हा देवतांनी श्रीविष्णूकडे प्रार्थना केली. वर्ष १९४१ च्या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी काश्मीर प्रदेशातील ‘शिवखोरी’ गुहेत श्रीविष्णूच्या जयंतावताराची आकाशवाणी झाली आणि वर्ष १९४२ च्या वैशाख कृष्ण पक्ष सप्तमीला श्रीविष्णूने ‘जयंत’ या नावाने अवतार धारण केला, असे सप्तर्षींनी सांगितले आहे. १३.५.२०२० या दिवशी गुरुदेवांना ७८ वर्षे पूर्ण होऊन त्यांनी ७९ व्या वर्षात पदार्पण केले. या वर्षांमध्ये त्यांनी ‘मानवाने साधना करून अहंकार नष्ट करणे’ यावर भर दिला आहे आणि ‘ईश्वरच सर्व करतो’ ही शिकवण स्वतःच्या कृतीतून दिली आहे. त्यांनी सनातनच्या साधकांना अहंभाव दूर करण्यासाठी ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ शिकवली आहे.
३ आ. अवतार असूनही ‘ईश्वरच सर्वकाही करतो’, याच भावाने जीवन जगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कशाचीही कमतरता (स्थूल किंवा सूक्ष्म) नाही, तरी त्यांचे वैयक्तिक जीवन एखाद्या संन्याशापेक्षाही सरळ आणि साधे आहे. ‘साधकांसाठी सर्वकाही करायचे; मात्र स्वतः नामानिराळे रहायचे’, ही त्यांची जीवनप्रणाली आहे. ‘नामानिराळे रहाण्यात ईश्वरी शक्तीचे सर्व रहस्य दडले आहे’, याची जाणीव करून देण्यासाठी भगवंत गुरुदेवांच्या रूपात साधकांच्या समवेत रहायला आला. ‘साधकांच्या समवेत रहात असतांना त्याने साधकांनाच त्याच्यासारखे कधी आणि कसे घडवले ?’, हे समजलेच नाही. ‘अहंशून्यता’ आणि ‘प्रीती’ ही सर्वार्ंत मोठी गुणरूपी अस्त्रे त्याने केव्हा आणि कशी वापरली ?’, तेही कळले नाही.
३ इ. गुरुदेवांच्या साध्या जीवनशैलीची जाणवलेली काही वैशिष्ट्ये
१. न्यूनतम आवश्यकता (गरजा) असणे आणि कधीही इतरांवर अवलंबून न रहाणे.
२. जीवनभर इतरांच्या आनंदाचा विचार करणे आणि त्यासाठी स्वतःचे शरीर झिजवणे.
३. साधकांमध्ये ईश्वरी गुण निर्माण होण्यासाठी त्यांना क्षणोक्षणी घडवणे आणि त्यांना कठीण परिस्थितीतून अलगदपणे बाहेर काढणे.
४. परात्पर गुरुपदावर आरूढ असूनही सतत शिष्यभावात रहाणे आणि साधकांना लीलया उच्च आध्यात्मिक अधिकार प्राप्त करवून देणे.
५. जीवनभर ‘हे माझ्यामुळे झाले; पण मी केले नाही.’ याच स्थितीत रहाणे.
४. श्रीविष्णूची शक्ती, म्हणजे श्रीमहालक्ष्मी हीच योगमाया आणि प्रकृती असणे
४ अ. अवताराच्या समवेत रहाणार्या भक्ताला श्रीविष्णूच्या तत्त्वरूपाची अनुभूती का येत नाही ? : श्रीविष्णु हा आनंदस्वरूप आहे. त्याच्या मूळ स्वरूपाची अनुभूती आल्यावर आपण कर्म करणे सोडून देऊ. तसे होऊ नये; म्हणून श्रीविष्णूची माया त्याच्या आज्ञेने भक्तांसाठी कार्यरत असते; म्हणून भक्त मायेत रहातो आणि त्याला मायेत राहूनच साधना करायची असते. अवतारी कार्य पूर्ण झाल्यावर श्रीविष्णूची माया दूर होते आणि श्रीविष्णूच्या भक्तांना त्याच्या मूळ सच्चिदानंद स्वरूपाची अनुभूती येते. श्रीविष्णुमाया, म्हणजे ‘श्रीमहालक्ष्मी’ होय !
५. अवताराने पृथ्वीवर जन्म घेतल्यावर त्याच्या सेवेसाठी जीव एकत्र कसे येतात ?
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्म भारतातील महाराष्ट्र राज्यातील नागोठणे या गावात झाला. ते मुंबईत असतांना काही जीव त्यांच्या संपर्कात आले. पुढे गुरुदेव गोव्यात आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाऊ लागल्यावर गोव्यातील आणि महाराष्ट्रातील काही जीव त्यांच्या संपर्कात आले. पुढे त्या साधकांच्या माध्यमातून अन्य राज्यांतील काही जीव जोडले गेले. हे सर्व कसे घडले ?’, याचे रहस्य काय ?’, याविषयी आद्य शंकराचार्यांनी ‘श्रीविष्णुपादादिकेशान्तस्तोत्र’ यात सांगितले आहे. ते म्हणतात, ‘सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण म्हणजे प्रकृती आणि ती प्रकृती, म्हणजे श्रीविष्णूची शक्ती श्री महालक्ष्मी होय. त्रिगुणांच्या सहाय्याने श्री महालक्ष्मी लीला करते. यामुळे जीव श्रीविष्णूच्या जवळ येतात किंवा दूर जातात. सत्त्व गुणाच्या साहाय्याने श्री महालक्ष्मी सर्व निर्जीव आणि सजीव प्राणीमात्रांचे पालन पोषण करते. श्रीविष्णूच्या आज्ञेने श्री महालक्ष्मी जेव्हा एखाद्या भक्तावर कृपा करते, तेव्हा त्या भक्ताच्या जीवनात समृद्धता निर्माण होते. अशा त्या श्री महालक्ष्मीला माझे त्रिवार वंदन असो.’ श्री महालक्ष्मीच्या कृपेमुळे सर्व साधकांच्या जीवनात असे प्रसंग घडले की, त्यांनी बुद्धीने साधना करण्याचा निर्णय घेतला आणि साधक श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांच्या संपर्कात आले.
६. श्रीविष्णूच्या अभय हस्ताचे महत्त्व !
श्रीविष्णूच्या अभय हस्ताविषयी आपण सर्वांनी ऐकले आहे. सध्या संपूर्ण पृथ्वीवर ‘कोरोना’ विषाणूरूपी वैश्विक संकट आहे. हा आपत्काळच आहे. समाजातील लोक, जगातील सर्व राष्ट्रे भय, चिंता आणि ताण यांनी ग्रासलेली आहेत. अनेक कोटी लोक केवळ एक वेळचे जेवण जेवत आहेत, तर अनेक लोकांना घर राहिलेले नाही. ‘भविष्य कसे असेल ?’, या चिंतेने अनेक लोक मानसिक रुग्ण होत आहेत. याउलट सनातनचे साधक साधना करत असल्यामुळे श्रीविष्णूचे अवतार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अभय हस्ताखाली सुरक्षित आहेत. आपत्काळातच श्रीविष्णूच्या ‘अभय हस्ता’चे महत्त्व लक्षात येते. यापुढेही कोरोनासारखे अनेक आपत्काळ येतील; मात्र गुरुदेव साधकांचा हात पकडून त्यांना फुलाप्रमाणे यातून तारून नेणार आहेत. ‘श्रीविष्णूचा अभय हस्त सर्व साधकांच्या मस्तकावर सतत असो आणि त्याच्या छत्रछायेखाली सर्व साधक आनंदाने आपत्काळाला सामोरे जावोत’, हीच श्रीविष्णूचे अवतार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.५.२०२०)