‘अर्थ’संकटातील भरारी !

संपादकीय 

कोरोनाचे वैश्‍विक संकट सध्या प्रत्येकालाच भेडसावत आहे. प्रतिदिन वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूदर यांची जागतिक आकडेवारी पहाता ‘या संकटाला पूर्णविराम कधी मिळेल ?’, असा प्रश्‍न सर्वांच्याच मनात निर्माण झालेला आहे. याचे उत्तर सद्यःस्थितीत कुणालाही ठाऊक नाही. त्यातच अनेक राष्ट्रांमध्ये घोषित केलेली दळणवळण बंदी, तसेच संचारबंदी यांमुळे भविष्यात होणारे भीषण परिणामही तज्ञ मंडळींना दिसत आहेत. एकूणच काय, तर ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी संपूर्ण जगाची स्थिती झाली आहे. कुणी कुणाकडे पहायचे आणि कुणी कुणाला वाचवायचे अन् सावरायचे, अशा बिकट परिस्थितीतून सर्वच राष्ट्रे जात आहेत. कोरोनानंतर येणार असलेली आर्थिक मंदी कशी दूर करायची ? या विवंचनेतही अनेक राष्ट्रे आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने अभ्यास, चिंतन, निष्कर्ष, ठोकताळे यांच्या बळावर आर्थिक मंदीच्या संकटाचा सामना करण्याचा विचार करत आहे. याच धर्तीवर रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी १७ एप्रिलला पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले, ‘‘सध्याचा काळ हा काळोखाचा असून आपल्याला प्रकाशाकडे पहावे लागेल. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आम्ही पुष्कळ सक्रीय झालेलो आहोत, तसेच आम्ही संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत.’’ या वेळी त्यांनी आर्थिक घडामोडी हाताळण्यासाठी बँका करत असलेले कार्य, तसेच आधुनिक वैद्य, परिचारिका आणि समाजसेवक यांची प्रशंसा केली, तसेच विविध निर्णयही घोषित केले. अर्थात आर्थिक मंदीला सामोरे जाण्याची भारताची ही काही पहिलीच वेळ नाही. याही आधी वर्ष १९९१, १९९८ आणि २००८ या काळात भारताने मंदीचा सामना केलेला होताच. त्यामुळे आर्थिक मंदीच्या गर्तेतून भारताला कसे बाहेर काढायचे ? अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ कशी दूर करायची ? व्यापक अर्थनीती कशी राबवायची ? याविषयीची ध्येय-धोरणे देशातील तज्ञांना ठाऊक आहेतच. केवळ या येणार्‍या मंदीच्या काळात अनेक स्तरांवर प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण राहील.

आर्थिक अभ्युदय आवश्यक 

सध्या बेरोजगारीची समस्या आधीच ‘आ’ वासून उभी आहे, त्यात कोरोनाच्या संकटामुळे ती आणखीनच जटील होणार, यात शंका नाही. हे लक्षात घेता शासनाने रोजगारनिर्मितीच्या अनेक संधी तरुणांना उपलब्ध करून द्यायला हव्यात. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीच्या माध्यमातून पुष्कळ रोजगार उपलब्ध आहे; पण सध्या शेतमालाला योग्य भाव न मिळणे, खरेदी न होणे, पीक पडून रहाणे यांसह अवेळी पडणारा पाऊस यांमुळे शेतीव्यवस्थाच आर्थिक संकटात सापडलेली आहे. हे पहाता शेतीला प्राधान्य देऊन शेतीची आर्थिक भरभराट कशी होईल, यादृष्टीने कर्ज, सोयीसुविधा शेतकर्‍यांना द्यायला हव्यात. उत्पादननिर्मिती, त्यासाठी होणारा व्यय यांत काटकसर करणे, उत्पादन साधनांचा होणारा अपव्यय टाळणे, राष्ट्रीय उत्पन्नाचे सामाजिक आणि आर्थिक न्यायानुसार वाटप करणे, भांडवलनिर्मिती किंवा त्यासाठीची गुंतवणूक अशा सर्वच गोष्टींसाठी दूरदृष्टी ठेवून विचार करायला हवा. पर्यटन क्षेत्र, बांधकाम व्यवस्था अशा क्षेत्रांवरही अधिक लक्ष केंद्रित करायला हवे. ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेत कार्यक्षमता ठेवणे क्रमप्राप्त आहे. ग्रामीण भागातील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी आर्थिक साहाय्याचे ‘पॅकेज’ही घोषित करावे लागेल. तसे केल्यासच एका टप्प्यानंतर अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू शकेल. थोडक्यात काय तर रोजगार अस्तित्वात ठेवण्यासह विविध प्रकारची ध्येयधोरणे आखल्यास आर्थिक अभ्युदय साधला जाऊ शकतो. त्यासाठी अर्थव्यवस्था ही गतीमान आणि समाजाच्या गरजांशी सुसंगती साधणारी असणेही तितकेच आवश्यक आहे. अर्थनीतीनुसार विकासाचा हेतू ठेवून नियोजनाचा पायाही भक्कम करावा लागेल. या सर्वांच्या जोडीला स्वदेशी आणि स्वावलंबन यांची कास धरूनच आर्थिक वाटचाल करावी लागणार आहे.

कोरोनाच्या आधीचा आणि नंतरचा भारत यात पुष्कळ तफावत असणार आहे. तो समतोल राखणे पुष्कळ महत्त्वाचे आहे. दळणवळण बंदीमुळे इतके दिवस घरात कोंडून रहावे लागल्याने लोकांची मानसिकता बिघडत आहे. त्यांना उभारी मिळेल, त्यांच्यात आशावाद निर्माण होईल, यासाठीही शासनाला तळागाळापर्यंत प्रयत्न करावे लागणार आहेत. त्या संदर्भातील प्रयत्नांचा आराखडा सिद्ध करण्यासाठी केंद्र पातळीवर आतापासूनच प्रयत्नरत रहावे लागणार आहे.

नागरिकांचे कर्तव्य

देशाची कोसळू पहात असलेली अर्थव्यवस्था उभी करणे आणि अर्थव्यवस्थेत नवचैतन्य आणणे यांसाठी देशातील नागरिकांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरते. दळणवळण बंदीमुळे सध्या जरी नागरिक घरी बसून असले, तरी अशा बिकट परिस्थितीत हताश किंवा निराशावादी न होता प्रत्येकाने सकारात्मक राहून एकजुटीने या संकटाचा सामना करायला हवा. दळणवळण बंदी उठल्यानंतर आपल्याला नव्या उत्साहाने आणि जोमाने कर्तव्यतत्पर व्हावे लागणार आहे. तेव्हा कुटुंब आणि पैसा यांचा संकुचित विचार न करता राष्ट्रासाठी व्यापक व्हा ! ‘वेळप्रसंगी अधिक घंटे काम करावे लागले, तरी चालेल; पण येऊ घातलेल्या मंदीच्या संकटातून आम्ही भारतीय देशाला बाहेर काढणारच’, असा निश्‍चय करावाच लागेल. समाजाच्या बळावरच राष्ट्राची उभारणी होत असते, हे लक्षात घ्यावे लागेल. कोरोना आणि त्यानंतर येणारी आर्थिक मंदी या भीषण संकटांचा सामना करत समर्थ भारत एक ना एक दिवस नक्कीच त्यातून बाहेर पडेल अन् फिनिक्स पक्षाप्रमाणे निश्‍चितच विश्‍वात भरारी घेईल, यात शंका नाही !