महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये थेट १ किंवा २ डझन आंबा विक्रीचा प्रयोग करणार ! – भाजपचे माजी आमदार बाळ माने

रत्नागिरी – हवामानातील पालट, अतीवृष्टी आणि थंडीच्या अभावामुळे कोकणातील हापूस आंबा अडचणीत सापडला आहे. त्यापाठोपाठ कोरोना विषाणूचे जागतिक संकट उभे राहिले आहेे. यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. याचा परिणाम आंबा विक्रीच्या दरावर होण्याचा धोका आहे. चालू असलेल्या सद्य:परिस्थितीनंतर आंबा एकदम बाजारात आल्यास दर पडतील. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हिताकरता रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये थेट १ किंवा २ डझन आंबा विक्रीचा प्रयोग केला जाणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ करतात; म्हणून ही संकल्पना श्री. माने यांनी येथे पत्रकारांना सांगितली.

महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार, भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि नाशिक आदी महापालिकांच्या क्षेत्रामध्ये आंब्याची थेट विक्री करणे शक्य होणार आहे.

नैसर्गिक पिकलेला आंबा हवा

शेतकर्‍यांनी बागेतून काढलेला आंबा नैसर्गिकरित्या पिकवून रंग पालटला की द्यावा. कोणत्याही रसायनामधून पिकवून देऊ नये. अधिक माहितीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हेमंतराव माने आणि दादा केळकर यांच्याशी संपर्क साधावा. ‘ही यंत्रणा विकसित करण्याकरता बागायतदारांनी सूचना कराव्यात’, त्याचा विचार करण्यात येईल.

एप्रिल मासात उपक्रमाला प्रारंभ

एप्रिल मासात ही योजना अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणार आहे. त्याकरता मुंबईच्या नातेवाईक मंडळींनीही साहाय्य करावे, असे आवाहन या वेळी श्री. माने यांनी केले आहे.