साधनेतील अडचणींवर बुद्धीच्या निश्‍चयाद्वारे मात करण्यासाठी स्वयंसूचना घ्या आणि पूर्णवेळ साधनेचे जीवनोद्धारक पाऊल शीघ्रतेने उचला !

पूर्णवेळ साधना करण्यास इच्छुक साधकांसाठी महत्त्वाची सूचना

‘आध्यात्मिक पातळी ५६ टक्क्यांच्या पुढे गेल्यावर पूर्णवेळ साधना करण्याच्या संदर्भात मनात विकल्प निर्माण होत नाहीत. त्यापेक्षा अल्प पातळीच्या साधकांना निर्णय घेणे कठीण जाते. त्यांना निर्णय घेता येण्यासाठी काय करावे ?, याचे मार्गदर्शन पुढील लेखात केले आहे.

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. पूर्णवेळ साधना करण्यास इच्छुक साधकांनी बुद्धीचा निश्‍चय करणे आवश्यक !

अनेक साधक स्वतःचे शिक्षण, नोकरी अथवा व्यवसाय सोडून पूर्णवेळ साधना करण्यास इच्छुक असतात. ते तशी इच्छाही उत्तरदायी साधकांकडे व्यक्त करतात. आंतरिक इच्छा असतांनाही कौटुंबिक अडचणी, तसेच मनाच्या स्तरावरील अडथळे यांमुळे ते पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय लवकर घेऊ शकत नाहीत. अशा साधकांनी बुद्धीचा निश्‍चय केल्यास त्या अडचणी ईश्‍वरकृपेने सहज दूर होतील.

२. पुढील स्वयंसूचना घेऊन साधना करण्याचा निर्धार करा !

मनाची द्विधा स्थिती नष्ट होऊन साधनेसाठी बुद्धीचा निश्‍चय होण्याकरता साधकांनी पुढील स्वयंसूचना द्यावी, ‘आतापर्यंत मी घेतलेल्या / अनुभवलेल्या शैक्षणिक जीवनातील / कौटुंबिक जीवनातील / व्यावसायिक जीवनातील समाधानाला मर्यादा आहेत. गुरुकृपेमुळे साधनेचे प्रयत्न केल्याने मला सर्वाधिक आनंद मिळत आहे. ‘पूर्णवेळ साधना करण्यामध्ये येणार्‍या अडथळ्यांवर मात करण्यासाठी मी काय प्रयत्न करावेत ?’, याविषयी उत्तरदायींनी केलेल्या मार्गदर्शनानुसार टप्प्याटप्प्याने प्रयत्न केल्यावर देवच मला त्यासाठी घडवील आणि पूर्णवेळ साधनेसाठी आत्मबलही देईल.’

३. अन्य सूत्रे

अ. ‘पूर्णवेळ साधना चालू केल्यानंतर कौटुंबिक अडचणी येतील’, असे वाटत असल्यास त्याविषयी उत्तरदायी साधकांशी मोकळेपणाने बोलून घ्यावे. त्यांनी सांगितलेला उपायात्मक दृष्टीकोन अंतर्भूत करून स्वयंसूचनाही घेऊ शकतो.

आ. आपली प्रकृती आणि परिस्थिती यांच्याशी साम्य असलेल्या पूर्णवेळ साधना करणार्‍या साधकांनी ‘हा निर्णय घेण्यासाठी मनाचा निर्धार कसा केला ?’ याविषयी त्यांना विचारून घेता येईल.

इ. आध्यात्मिक त्रासामुळे ‘पूर्णवेळ साधनेचा निर्णय घेऊ नये’, असे वाटत असल्यास नामजपादी  उपाय वाढवावेत, तसेच उत्तरदायी साधकांशी बोलून घ्यावे.

ई. आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणे कठीण वाटत असल्यास काही कालावधीसाठी आश्रमात राहून आश्रमजीवनाचा अनुभव घ्यावा. काही साधकांनी हा प्रयत्न केल्यावर निर्णय घेण्यासाठी त्यांचा आत्मविश्‍वास वाढला आणि त्यांनी पूर्णवेळ साधनेला आरंभ केला.

आपत्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महद्’भाग्याने मिळालेल्या मनुष्यजन्माचा उद्धार होण्यासाठी वेळ न दवडता पूर्णवेळ साधनेचे पाऊल शीघ्रतेने उचला !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.३.२०२०)