पंढरपूर येथे अत्याधुनिक ‘एआय’द्वारे ३२ लाख वारकर्‍यांची अचूक मोजणी !

सोलापूर ग्रामीण पोलिसांचा ऐतिहासिक उपक्रम

अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय) तंत्रज्ञानाचा वापर करून वारकर्‍यांची मोजणी

पंढरपूर – आषाढी वारीच्या काळात सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने गर्दी व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केला. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली ‘सेंटियंट लॉजिक्स’ या संस्थेच्या सहकार्याने एआय तंत्रज्ञानाद्वारे २४ ते २६ जुलै या ३ दिवसांत ३१ लाख ९८ सहस्र १२९ (अनुमाने ३२ लाख) वारकरी भाविकांची अचूक नोंद करण्यात आली.

एआय प्रणालीच्या आकडेवारीनुसार २४ जुलै या दिवशी ६ लाख ७५ सहस्र २७४, २५ जुलै या दिवशी १८ लाख ९६ सहस्र ५७३, तर २६ जुलै या दिवशी ६ लाख २६ सहस्र २८२ भाविकांनी पंढरपुरात प्रवेश केला. एकादशीच्या दिवशी सर्वाधिक १९ लाख वारकरी पंढरपुरात आल्याचे या नोंदीतून स्पष्ट झाले. पारंपरिक कॅमेरा प्रणालीमध्ये एकाच व्यक्तीची अनेक वेळा नोंद होण्याची शक्यता असते; मात्र या एआय प्रणालीने प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र डिजिटल ओळख सिद्ध करून दुबार मोजणी पूर्णपणे टाळली.

सरगम चौक–इंदिरा गांधी चौक, तीन रस्ता–दगडी पूल, गोपाळपूर पूल, सावरकर चौक–मिलिटरी हॉस्टेल आणि सांगोला चौक या ५ प्रमुख प्रवेशमार्गांवर विशेष एआय छायाचित्रक बसवण्यात आले होते. चेहरा, कपड्यांचा रंग आणि डोक्यावरील टोपी यांसारख्या वैशिष्ट्यांच्या आधारे प्रत्येक वारकर्‍याची स्वतंत्र ओळख निश्चित करण्यात आली. तसेच वारकरी शहरात फिरतांना विविध सी.सी.टी.व्ही. कॅमेर्‍यांमधून त्यांचा एकाच ओळखीने आढावा घेण्यात आला. शहराबाहेर जाऊन पुन्हा प्रवेश करणार्‍या भाविकांची आधीच्या नोंदीशी पडताळणी करून पुनर्मोजणी टाळण्यात आली.

या प्रक्रियेदरम्यान भाविकांच्या गोपनीयतेचेही काटेकोर पालन करण्यात आले. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (डीपीडीपी, डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण) कायदा आणि जी.डी.पी.आर्. (सामान्य डेटा संरक्षण नियमन) नियमावलीनुसार कोणत्याही व्यक्तीचे छायाचित्र किंवा वैयक्तिक माहिती सर्व्हरवर साठवण्यात आली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

याविषयी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले की, पंढरपूर येथील आषाढी वारी हा जगातील सर्वांत मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक आहे. लाखो वारकर्‍यांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रभावी नियोजनासाठी गर्दीची अचूक माहिती आवश्यक असते. एआय तंत्रज्ञानामुळे अनुमाने ३२ लाख भाविकांची अचूक नोंद करणे शक्य झाले असून भविष्यात गर्दी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी या तंत्रज्ञानाचा मोठा लाभ होणार आहे.