आषाढी वारीत ‘आयुर्वेद व्यासपिठा’ची वारकर्‍यांसाठी आरोग्यसेवा !

२० सहस्र वारकर्‍यांना विनामूल्य औषधवाटप

पंढरपूर – आषाढी वारीनिमित्त ‘आयुर्वेद व्यासपीठ’ पंढरपूर आणि सोलापूर शाखेच्या वतीने वारकर्‍यांसाठी विनामूल्य आरोग्यसेवा उपक्रम राबवण्यात आला. या सेवेत २० सहस्रांहून अधिक वारकर्‍यांना गुडघेदुखी, सर्दी, खोकला आदी आजारांवरील आयुर्वेदिक औषधांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. याच समवेत कांस्यथाळी उपचार, अग्निकर्म आणि वारकर्‍यांची चरणसेवा करण्यात आली.

या उपक्रमात कुडाळ येथील वैद्य सुविनय दामले, वैद्य व्यंकटेश धर्माधिकारी, वैद्य शिरीष पेंडसे, वैद्य वर्षा दुरतकर, ‘आयुर्वेद व्यासपिठा’चे केंद्रीय कार्यकारिणी अध्यक्ष वैद्य मल्हार जोशी, वैद्य प्रदीप मदन नाईक, ‘आयुर्वेद व्यासपीठ सोलापूर शाखे’चे अध्यक्ष वैद्य रवींद्र पाटील, पंढरपूर शाखेचे अध्यक्ष वैद्य मिलिंद जोशी यांसह अनेक वैद्य सहभागी झाले होते. या उपक्रमासाठी नाना मालक कवठेकर यांनी १० सहस्र लिटर तेल, औषध, कफसिरप उपलब्ध करून दिले, तसेच बीड येथील वैद्य शिवप्रसाद चरखा यांनी सिद्ध केलेला तुळशीकाढा सर्दी-खोकल्यावरील उपाय म्हणून वारकर्‍यांना वितरित करण्यात आला. या सेवेमुळे सहस्रो वारकर्‍यांना आयुर्वेदिक उपचारांचा लाभ झाला. वारकर्‍यांची प्रत्यक्ष सेवा करण्याची संधी लाभल्याने सर्व सहभागी वैद्यांनी ‘हीच आमच्यासाठी खर्‍या अर्थाने वारी ठरली’, अशी भावना व्यक्त केली.