अजिंक्यतारा आणि संगम माहुली विकासकामांना प्रशासकीय मान्यता ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री

अजिंक्यतारा गड

सातारा, २८ जुलै (वार्ता.) – अजिंक्यतारा गडाचे जतन, संवर्धन आणि परिसर सुशोभीकरण यांसाठी १३४.८० कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता मिळाली आहे. संगम माहुली येथील महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचे संवर्धन, जीर्णोद्धार, तसेच भूमी विकसित करण्यासाठी १३२.९५ कोटी रुपयांच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ही दोन्ही कामे वेगाने आणि गुणवत्तापूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

मंत्री भोसले पुढे म्हणाले, ‘‘या दोन्ही विकासकामांच्या निविदा एकत्रित काढाव्यात. अजिंक्यतारा गडसंवर्धन कामात विविध ठिकाणी पायवाटा निर्माण करण्यात येणार आहेत. रात्रीच्या वेळी गडावर वन्य प्राण्यांचा वावर असतो, त्यामुळे प्रकाश केवळ पायवाटांवर पडेल, अशा स्वरूपाचे दिवे बसवावेत. संवर्धनाच्या कामातून निधी  राहिल्यास खिंडीतील गणपति मंदिरापासून अजिंक्यतारा गडापर्यंत पायवाट निर्माण  करावी, तसेच संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष अजिंक्यतारा गडाची पहाणी करावी. संगम माहुलीच्या प्रवेशद्वारापासून गावापर्यंतचा रस्ता काँक्रीटचा करावा आणि  रस्त्याची रुंदी वाढवावी. यासाठी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन चर्चा करावी.  संगम माहुली येथे वाहनतळ व्यवस्थेसह गावातील सर्व कूपनलिका (गटारे) बंदीस्त करावीत. अजिंक्यतारा आणि संगम माहुली येथील कामे करतांना गुणवत्तेविषयी कोणतीही तडजोड करू नका ! ही दोन्ही कामे सातारा शहरातील नागरिकांच्या कायम स्मरणात राहतील, अशा उत्कृष्ट गुणवत्तेची झाली पाहिजेत.’’