गुरु सगुण रूप, तर ‘गुरुपादुका’ हे गुरूंची आध्यात्मिक शक्ती आणि चैतन्य प्रसारित करणारे त्यांचे निर्गुण स्वरूप आहे !

२९ जुलै २०२६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्ताने…

प.पू. भक्तराज महाराज

१. संतांच्या चरणपादुका 

‘भारतात अनादि काळापासून सनातन संस्कृती विद्यमान आहे. प्रारंभी सत्यस्वरूप ज्ञानप्राप्तीसाठी साधूसंत, ऋषिमुनी, योगी, तपस्वी सर्वस्वाचा त्याग करून रानावनांत निर्जन ठिकाणी जप, तप, योग, तपस्या इत्यादी करत असत. जे सत्यस्वरूप ज्ञानाचे अधिकारी ठरले, त्यांनी त्याचा प्रचार-प्रसार व्हावा; म्हणून ‘गुरुकुला’च्या माध्यमातून शिक्षण देण्यास आरंभ केला. समाजाला त्याचा पुष्कळ उपयोग झाला. आजही गुरुकुल, आश्रम, मठ, गुरुमंदिर आणि देवालये यांच्या माध्यमांतून ही सेवा सर्वत्र आढळते. यांद्वारे संस्कृत भाषेतून साधनारत विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचा इतिहास, परंपरा, वेद, उपनिषदे, तंत्रमंत्र, शास्त्रे आणि प्राचीन ग्रंथांचा अभ्यास शिकवला जातो.

गुरूंचे कार्य शिष्याला अंधःकारातून प्रकाशाकडे नेणे, अर्थात् सत्-स्वरूपाचे ज्ञान देणे. जेव्हा हे ज्ञान प्राप्त करून शिष्य स्वतंत्र होतो, तेव्हा ते त्याला प्रत्यक्ष मार्गदर्शन करतात; पण गुरूंनी देहत्याग केल्यानंतर हीच प्रक्रिया अप्रत्यक्ष रूपाने सूक्ष्म रूपात त्यांच्या पादुकांद्वारे होते. गुरु देह नसून चैतन्यस्वरूप तत्त्व होय. तेच ईश्वराचे सगुण स्वरूपही आहेत. गुरु जप-तप आणि तपस्या यांतून जी प्रचंड आध्यात्मिक शक्ती आणि चैतन्य मिळवतात, तीच शक्ती त्यांच्या चरणपादुकांतून सतत प्रसारित होते. यावरून पुढील शिकवण मिळते.

श्री. अशोक भांड

अ. साधक अथवा शिष्याने नेहमी नम्र आणि ग्रहणीय असावे.

आ. त्यांची दृष्टी नेहमी गुरुचरणांकडे असावी. (प.पू. बाबांची (प.पू. भक्तराज महाराज यांची) दृष्टी नेहमी गुरूंच्या चरणांवर असायची.)

इ. गुरु अथवा त्यांच्या पादुकांना नमन करणे, म्हणजे सत्य स्वरूपाला समर्पित होणे

ई. जी चैतन्यरूपी ऊर्जा गुरुचरणांवर मस्तक टेकताच अंतःकरणाकडे वाहू लागते, तीच त्यांच्या पादुकांतून स्पंदनांद्वारे प्राप्त होते. त्यांचा अनंताकडे प्रवास निरंतर चालू असतो.

उ. पादुकांचा सत्यज्ञान प्रवास अखंड चालू असतो.

ऊ. गुरूंप्रमाणेच त्यांच्या पादुका साधक आणि शिष्य यांना मोक्षप्राप्तीसाठी सूक्ष्म स्वरूपातून मार्गदर्शन करतात.

म्हणूनच आम्ही गुरुपौर्णिमा भव्य-दिव्य स्वरूपात आनंदाने साजरी करतो. गुरु सगुण रूपात असतात, तर त्यांच्या पादुका हे त्यांचे निर्गुण स्वरूप असते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांचे आध्यात्मिक चैतन्य, शक्ती सहस्र पटींनी वाढलेली असते; म्हणून गुरुपौर्णिमेला साधक आणि भक्त यांनी अधिकाधिक वेळ गुरूंचे सान्निध्य, सेवा, नामस्मरण, भजने, सत्संग इत्यादींत घालवावा. भंडारा घालून अन्नदान करावे. गुरूंचा आशीर्वाद नक्कीच फलदायक ठरेल !

२. शिदोरी 

प.पू. भक्तराज महाराज यांनी चालू केलेली ही परंपरा आजही चालू आहे. सोप्या भाषेत म्हटले, तर ‘शिदोरी’ म्हणजे अल्पाहार. बाहेर गावाहून त्यांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना परतीच्या प्रवासात अडचण आल्यास त्यांना आणि लहान मुलांना भूक लागल्यास थोडाफार आधार मिळावा; म्हणून दिला जाणारा हा प्रसाद. आपल्याला ठाऊकच आहे की, ‘प्रसादाचा कण’ हा किती मौल्यवान असतो. प.पू. बाबा परतीच्या प्रवासास जाणार्‍या सर्व भक्तांना आवर्जून शिदोरी घेऊन जाण्यास सांगायचे.

प.पू. बाबांच्या दर्शनास गरीब, श्रीमंत सर्व यायचे, तसेच आजही येतात. बाबांनी कधीही कोणताही भेद केला नाही. सर्वांनाच सारखीच वागणूक मिळायची.

आजही ही परंपरा चालू आहे. त्यांना भक्तांची किती काळजी आहे ! त्यांचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. धन्य ती सद्गुरु माऊली. त्यांच्या चरणी शत्शत् प्रणाम !’

सेवक  –  श्री. अशोक भांड, इंदूर (१०.७.२०२६)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.