Germany Narcissists Country :  संशोधन : जर्मनीत सर्वाधिक आत्ममुग्ध (नार्सिसिस्ट) लोकांचा भरणा !

चीन तिसर्‍या, तर अमेरिका १६ व्या स्थानावर !

(नार्सिसिस्ट म्हणजे आत्ममुग्ध. अशा व्यक्ती अतिशय आत्ममग्न असतात. त्यांच्या वर्तनामागे स्वतःचे महत्त्व अवास्तव वाटण्याची भावना असते. सतत कौतुक मिळवण्याची तीव्र इच्छा आणि इतरांविषयी सहानुभूतीचा पूर्ण अभाव अशा व्यक्तींमध्ये असतो.)

लॅन्सिंग (अमेरिका) – ‘मिशिगन स्टेट विद्यापिठा’च्या संशोधकांनी एका मोठ्या अभ्यासातून लोकांचे व्यक्तीमत्त्व आणि त्यांच्यातील आत्ममुग्ध वर्तनाविषयी आश्चर्यकारक निष्कर्ष मांडले. सामान्यतः असे मानले जाते की, अमेरिकी लोक स्वतःला सर्वाधिक महत्त्व देतात; परंतु या संशोधनाने जर्मनीत अशा लोकांचा सर्वाधिक भरणा असल्याचा निष्कर्ष मांडला. त्यानंतर इराक, चीन, नेपाळ आणि दक्षिण कोरिया यांचा क्रमांक लागतो. संशोधनात ५३ देशांतील ४५ सहस्र ८०० लोकांचा अभ्यास करण्यात आला. यांमध्ये अमेरिका १६ व्या स्थानावर होती.

कसे करण्यात आले संशोधन ?

१. संशोधनात सहभागी असणार्‍यांना ‘माझ्या उल्लेखनीय कामगिरीमुळे मी आकर्षणाचे केंद्र बनतो’ आणि ‘माझ्या प्रतिस्पर्ध्यांनी अपयशी व्हावे’, अशी माझी इच्छा आहे’, यांसारख्या विधानांशी ते किती सहमत आहेत ?, असे विचारण्यात आले होते.

२. संशोधनातून आत्ममुग्धतेचे २ प्रकार स्पष्ट झाले :

अ. ‘प्रशंसा-प्रियता’ : एखादी व्यक्ती स्वतःला चांगल्या रूपात सादर करण्याचा, लक्ष वेधून घेण्याचा आणि इतरांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करते.

आ. ‘प्रतिस्पर्धा-वृत्ती’ : स्पर्धा, इतरांना न्यून लेखणे आणि प्रतिस्पर्ध्यांच्या अपयशाची इच्छा धरणे, यांसारख्या प्रवृत्तींचा समावेश होतो.

३. या स्वभाववैशिष्ट्यांचे घातक परिणाम : संशोधकांचे म्हणणे आहे की, जरी प्रशंसा-प्रियतेमुळे तात्पुरता आत्मविश्वास आणि लोकप्रियता वाढू शकत असली, तरी प्रतिस्पर्धा-वृत्तीमुळे दीर्घकाळात संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो, आत्मसन्मान अल्प होऊ शकतो अन् सामाजिक संघर्ष उद्भवू शकतो.

४. तरुणांमध्ये ‘नार्सिसिझम’ प्रमाण अधिक : या अभ्यासातून जवळपास सर्वच देशांमध्ये एक समान कल दिसून आला की, वृद्ध लोकांच्या तुलनेत तरुणांमध्ये ‘नार्सिसिझम’ अधिक प्रमाणात आढळते. याव्यतिरिक्त महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये याचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले.

५. सामूहिक संस्कृती असलेल्या देशांविषयी आश्चर्यकारक निष्कर्ष : सामूहिक संस्कृती असलेल्या देशांमधील लोकांमध्येही ‘नार्सिसिझम’चे उच्च प्रमाण आढळले. यापूर्वी असा समज होता की, अशा संस्कृतींमध्ये लोक समूह आणि समाज यांना अधिक महत्त्व देतात. तथापि या अभ्यासाने हा समज चुकीचा असल्याचे सिद्ध केले.