सोलापूरमधील इंग्रजकालीन कामगार वसाहतीमधील ९ सहस्र कुटुंबांना मिळणार घराचा मालकी हक्क !

मुंबई, ९ जुलै (वार्ता.) – सोलापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील इंग्रजकालीन कामगार वसाहतीमधील ९ सहस्र कुटुंबियांच्या घराच्या मालकी हक्काचा किचकट प्रश्न शासनाने सोडवला आहे. या सर्व कुटुंबियांना घराचा मालकी हक्क देण्याचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ९ जुलै या दिवशी निवेदनाद्वारे विधानसभेत याविषयीची माहिती दिली. या सर्व कुटुबांमध्ये ४० सहस्र लोक रहातात.

या निर्णयाविषयी स्थानिक आमदार देवेंद्र कोठे यांनी समाधान व्यक्त केले. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही यासाठी सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.

वर्ष १९८९ मध्ये असलेल्या बाजारभावाच्या अवघ्या अडीच पटीने ही भूमी संबंधित कुटुंबियांना देण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेकांकडे हा प्रश्न गेला; मात्र तांत्रिक अडचणींमुळे हा प्रश्न सुटू शकला नव्हता.  स्थानिक आमदार देवेंद्र कोठे आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

काय आहे प्रकरण ?

११८ वर्षांपूर्वी इंग्रजांच्या काळात कामगारांसाठी या वसाहती स्थापन करण्यात आल्या होत्या. सोलापूर येथील या कामगार वसाहतीची भूमी ‘बी २’ प्रवर्गात होती. ‘बी-२’ प्रवर्गात असल्यामुळे भूमीचा मालकी हक्क असला तरी त्यावर कायदेशीर मालकी हक्क प्राप्त होत नाही. त्यामुळे या भूमीचे वारसदार नेमणे, कुटुंबियांना कर्ज प्राप्त न होणे अशा अडचणी येत होत्या. काँग्रेस सरकारच्या काळापासून मागील अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबत होता. या वसाहतीची भूमी ‘बी २’ प्रवर्गातून ‘भोगवटादार वर्ग – १’ आणण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे या कुटुंबियांचा या भूमीवर मालकी हक्क येणार आहे.