रेल्वेस्थानक छताचा भाग कोसळला : उत्तरदायी ठेकेदाराला काळ्या सूचीत टाका !

रत्नागिरीत मनसेची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी !

रत्नागिरीत मनसेची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी !

रत्नागिरी –  रेल्वेस्थानक परिसर आणि रिक्शा स्टँड जवळील सुशोभिकरण केलेल्या छताचा काही भाग कोसळल्याची गंभीर घटना ५ जुलै २०२६ च्या रात्री ११ वाजता घडली. या पार्श्वभूमीवर ८ जुलै या दिवशी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष रूपेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनाद्वारे या अपघाताला उत्तरदायी असणारे कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांवर तातडीने गुन्हे नोंद करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

या निवेदनात म्हटले आहे की, ‘अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत सुमारे ४० कोटी रुपये खर्च करून रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे सुशोभिकरण आणि नूतनीकरण करण्यात आले आहे. वर्षभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली झालेल्या या कामातील छताचा मोठा भाग अचानक कोसळला. एकाच कामात दुसर्‍यांदा अशी दुर्घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून संपूर्ण कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कामाचा असा निकष्ट दर्जा राहिल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. या संपूर्ण सुशोभिकरण प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करून तातडीने ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात यावे. तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणार्‍या ठेकेदाराला तात्काळ काळ्या सूचीत टाकण्यात यावे.