राज्यातील १८१ महाविद्यांमध्ये किमान शैक्षणिक सुविधा नसल्याचे उघड !

  • महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन २०२६

  • विद्यापिठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक, ग्रंथालये, प्रयोगशाळा आदींची वानवा

  • नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागांत अशा महाविद्यालयांची संख्या सर्वाधिक

श्री. सचिन कौलकर, विशेष प्रतिनिधी, सनातन प्रभात

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – गेल्या ३ वर्षांत राज्यातील विविध विद्यापिठांशी संलग्न असलेल्या १८१ महाविद्यालयांमध्ये पात्र प्राध्यापक वर्ग, प्रयोगशाळा, ग्रंथालये, किमान विद्यार्थी संख्या यांसारख्या शैक्षणिक सुविधा नसल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे विभाग आघाडीवर आहेत, अशी माहिती उच्च अन् तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ९ जुलै या दिवशी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. विधान परिषदेतील आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड आणि अन्य आमदारांनी याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

शासनाच्या माहितीनुसार गेल्या ३ वर्षांत पडताळणीच्या वेळी विद्यापिठांची संलग्नता असूनही भौतिक सुविधा आणि पात्र शिक्षक नसलेल्या महाविद्यालयांत छत्रपती संभाजीनगर विभागात ८२ महाविद्यालये, नागपूर विभागात ४१ महाविद्यालये, पुणे विभागात २४, अमरावती विभाग २३, नाशिक विभागात ९ महाविद्यालये आणि कोकण विभागात २ महाविद्यालयांचा समावेश आहे.

नियमांचे उल्लंघन करणार्‍या महाविद्यालयांवर विद्यापिठाच्या स्तरावर कारवाई चालू !

या संदर्भात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६’ मधील कलम १०८, ११७ आणि १२० अन्वये अशा महाविद्यालयांच्या परिसंस्थांची पडताळणी केली जाते. ज्या महाविद्यालयांनी निकषांची पूर्तता केलेली नाही, त्यांच्यावर विद्यापिठाच्या स्तरावर संलग्नता काढून घेणे किंवा रहित करणे, अशी कारवाई चालू आहे.

संपादकीय भूमिका

पुरेशा सोयी-सुविधा आणि प्राध्यापक नसतांनाही केवळ नफेखोरीसाठी महाविद्यालये चालवणे, हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केलेला द्रोहच आहे. अशा महाविद्यालयांचे परवाने त्वरित रहित करून संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदवावेत !