अन्वेषण यंत्रणांनी ३५० प्रकरणांत धाडी घालूनही भ्रष्ट अधिकार्‍यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्याची अनुमती नाही !

भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा संताप

आमदार सुधीर मुनगंटीवार

मुंबई, ८ जुलै (वार्ता.) – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या दीड वर्षात ३५० प्रकरणांत धाडी घालूनही भ्रष्ट अधिकार्‍यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यासाठी वरिष्ठांनी अद्याप अनुमती दिलेली नाही. चौकशीचा अर्थ आज-काल ‘कुणीच दोषी नाही’ असा झाला आहे, अशा शब्दांत त्यांनी यंत्रणेवर ताशेरे ओढले. चौकशीच्या नावाखाली केवळ दोषींना संरक्षण दिले जात असून भ्रष्ट अधिकार्‍यांवर तातडीने कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत ८ जुलै या दिवशी केली.

संगणकातील महत्त्वाची माहिती नष्ट करण्यासाठी मंत्रालयातील वीज जाण्यासारखे प्रकार होऊ शकतात

मंत्रालयातील वीज खंडित होण्याच्या घटनेवर आणि प्रशासकीय भ्रष्टाचारावर भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र आक्षेप घेतला. ‘मंत्रालयासारख्या ठिकाणी वीज जाणे अत्यंत गंभीर असून एखाद्या संगणकातील महत्त्वाची माहिती (डेटा) नष्ट करण्यासाठी असे प्रकार केले जाऊ शकतात. आज-काल असे ‘कलाकार’ वाढले आहेत’, असा संशय त्यांनी ८ जुलै या दिवशी विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.

संपादकीय भूमिका

अशाने भ्रष्टाचार कधीतरी संपेल का ? जनतेचा विश्वास संपादन करायचा असेल, तर भ्रष्ट अधिकार्‍यांविरुद्ध तत्परतेने कारवाई होणे अपेक्षित आहे !