देवतांच्या भग्न मूर्तींची विटंबना रोखण्यासाठी ‘हिंदवी सेने’च्या वतीने विसर्जन पेटी उपलब्ध

फलक लावलेली विसर्जन पेटी

सोलापूर – शहरातील मंदिराच्या परिसरात जीर्ण झालेल्या देवतांच्या मूर्ती, फाटलेली धार्मिक चित्रे आणि धार्मिक साहित्य अयोग्य ठिकाणी टाकले जात असल्याने त्यांची विटंबना होऊ नये, यासाठी ‘हिंदवी सेना, महाराष्ट्र राज्य’च्या वतीने विशेष उपक्रम चालू करण्यात आला आहे. दत्त चौक येथील गणपति घाट, गणेश कुंडाजवळ जीर्ण मूर्ती, धार्मिक चित्रे आणि धार्मिक साहित्य जमा करण्यासाठी विशेष लोखंडी पेटी ठेवण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांनी जीर्ण झालेले धार्मिक साहित्य जमा करावे. त्यानंतर सर्व मूर्ती आणि चित्र यांचे हिंदु धर्मपरंपरेनुसार विधीवत् विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती ‘हिंदवी सेने’चे अध्यक्ष श्री. सुधीर बहिरवाडे यांनी दिली.

या वेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. दास शेळके यांनी नागरिकांना मंदिर परिसर किंवा सार्वजनिक ठिकाणी भग्न मूर्ती आणि धार्मिक चित्रे न ठेवता ते गणपति घाट येथील विशेष लोखंडी बॉक्समध्ये जमा करून या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे धार्मिक भावना जपण्यास, मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवण्यास आणि देवतांच्या प्रतिमांचा सन्मान राखण्यास साहाय्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सर्वश्री देविदास मेटकरी, प्रशांत पवार, लतेश हिरवे, पुजारी चैतन्य शिरशीकर, सुमित लांडगे, विनायक पाटील, योगेश कणके, अविनाश हजारे, संतोष चव्हाण यांच्यासह महिला, युवक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.