Saudi Crude Oil : सौदी अरेबियाने तेलाच्या किमतीत केली कपात

रियाध (सौदी अरेबिया) – जगातील सर्वांत मोठ्या तेल निर्यातदारांपैकी एक असलेल्या सौदी अरेबियाने आशियाई ग्राहकांसाठी ‘अरब लाइट’ (हलके आणि अल्प सल्फर असलेल्या) कच्च्या तेलाच्या किमतीत कपात केली आहे. ऑगस्टपासून पुरवठा करण्यात येणार्‍या कच्च्या तेलाच्या प्रति बॅरलवर ११ डॉलरची मोठी कपात करण्यात येणार आहे. जुलै महिन्यात ही किंमत ७४ डॉलर प्रति बॅरल आहे. गेल्या २६ वर्षांतील आशियासाठी केलेली ही सर्वांत मोठी मासिक कपात मानली जात आहे.

भारतात पेट्रोल-डिझेल लगेच स्वस्त होणार का ?

तज्ञांचे म्हणणे आहे की, कच्चे तेल स्वस्त झाले म्हणजे पेट्रोल आणि डिझेल लगेच स्वस्त होईल, असे नाही. भारतातील किरकोळ इंधनाच्या किमती आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाची किंमत, मालवाहतूक खर्च, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य, केंद्र आणि राज्य सरकार यांनी लावलेले कर अन् सरकारी तेल आस्थापनांनी लावलेल्या किमती यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल दीर्घकाळ स्वस्त राहिले आणि तेल आस्थापनांनी त्याचा लाभ ग्राहकांपर्यंत पोचवला, तरच पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात दिलासा मिळण्याची शक्यता असेल.