ओमानच्या समुद्रात एका नौकेवर क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण : इराणवर संशय

प्रतिकात्मक छायाचित्र

तेहरान (इराण) – ओमानच्या समुद्रात ७ जुलैच्या पहाटे एका नौकेवर क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण करण्यात आल्याची माहिती ब्रिटीश सैन्याने दिली. ‘युनायटेड किंगडम मॅरीटाईम ट्रेड ऑपरेशन्स’ने सांगितले की, ओमानमधील लिमाहच्या पूर्वेला या नौकेवर आक्रमण झाले.

‘युनायटेड किंगडम मॅरीटाईम ट्रेड ऑपरेशन्स’च्या माहितीनुसार ही नौका होर्मुझच्या सामुद्रधुनीतून (२ जलाशयांना जोडणार्‍या जलमार्गातून) दक्षिणेकडे ओमानच्या आखाताच्या दिशेने प्रवास करत असतांना एक क्षेपणास्त्र या नौकेवर आदळले. यामुळे नौकेला आग लागली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. सागरी संस्थेने सांगितले की, अधिकारी या घटनेचे अन्वेषण करत असून या भागातून प्रवास करणार्‍या इतर नौकांना दक्षता बाळगण्याचा आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित माहिती देण्याची सूचना देण्यात आली आहे. हे आक्रमण इराणने केल्याचा संशय अमेरिकेने व्यक्त केला आहे.