Telangana DSP Corruption : तेलंगाणामध्ये पोलीस उपअधीक्षकाची २०० कोटी रुपयांची अवैध संपत्ती

पोलीस उपअधीक्षकाशी निगडित १६ ठिकाणांवर धाड

पोलीस उपअधीक्षक संकीरेड्डी भीम रेड्डी (चौकटीत)

भाग्यनगर – येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शहरातील पोलीसदलाच्या ‘कॉम्प्युटर सर्व्हिस’ विभागाचे पोलीस उपअधीक्षक संकीरेड्डी भीम रेड्डी यांच्या घरासह १६ ठिकाणांवर धाड घातली. यामध्ये रेड्डी यांचे घर आणि त्यांचे नातेवाईक, मित्र आणि सहकारी यांच्याशी संबंधित मालमत्तांचा समावेश होता.विभागाच्या म्हणण्यानुसार ‘रेड्डी यांची २०० कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता आहे. यांच्याकडे उत्पन्नाच्या स्रोतांहून अधिक संपत्ती आहे. या अधिकार्‍याने त्याच्या नोकरीच्या कार्यकाळात भ्रष्टाचार आणि इतर अवैध मार्गांनी प्रचंड संपत्ती जमा केली.’ याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २ जुलै या दिवशी एकाच वेळी १६ ठिकाणी झडती घेतली.

१. या धाडीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांना रेड्डी यांच्या तेलंगाणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये असलेल्या अफाट मालमत्तेशी निगडित अनेक महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत.

२. रेड्डी यांच्या मालकीचे २ आलिशान बंगले, गाचीबोवली आणि तेल्लापूर येथे ४ सदनिका, नागोले अन् पाटणचेरू येथे ३ भूखंड, मणिकोंडा येथील व्यावसायिक संकुलामध्ये भागीदारी आदी गोष्टींचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

३. कर्नाटक, तसेच तेलंगाणा येथील संगारेड्डी, विकाराबाद आणि मुचिंताला येथे ५० एकरपेक्षा अधिक शेतभूमीही त्यांच्या मालकीची आहे.

४. अधिकार्‍यांनी घेतलेल्या झडतीच्या वेळी रेड्डी यांच्या घरातून ३ लाख ६ सहस्र रुपये रोख आणि एका नातेवाईकाच्या घरातून ४० लाख रुपये जप्त करण्यात आले. यासह २ किलो सोन्याचे दागिने आणि २० किलो चांदीच्या वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत.

५. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचा बाजारभाव २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

संपादकीय भूमिका

अशा भ्रष्ट पोलीस अधिकार्‍याने कशा प्रकारे कर्तव्य बजावले असेल ?, याचा विचारच न केलेला बरा ! भ्रष्टाचाराची बजबजपुरी बनलेले पोलीसदल कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?