इराणचे नेतृत्व आम्ही एका झटक्यात संपवू शकतो ! – Donald Trump

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प (डावीकडे)

वॉशिंग्टन (अमेरिका) – आम्ही ठरवले, तर इराणच्या उर्वरित संपूर्ण नेतृत्वाचा एका झटक्यात अंत करू शकतो, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी दिली. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या पार्श्वभूमीवर ‘ॲक्सिओस’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. तथापि आम्हाला इराणशी वाटाघाटी चालू ठेवायच्या असल्याने आम्ही तसे करणार नाही; कारण ते सर्व एकाच ठिकाणी आहेत, आम्ही त्यांना संपवले, तर आम्ही चर्चा कुणाशी करणार?, असा उपहासात्मक प्रश्नही ट्रम्प यांनी उपस्थित केला.

ट्रम्प पुढे म्हणाले, ‘‘लोकांना खामेनी यांचा तिरस्कार वाटत असेल, असे मला वाटले होते. नागरिक ढाळत असलेले अश्रू खरे आहेत कि बनावट?, याविषयी माझ्या मनात शंका आहे.’’

अमेरिकेकडे ना संस्कृती, ना इतिहास, ना सन्मान ! – इराण

ट्रम्प यांच्या या विधानावर आर्मेनियातील इराणच्या दूतावासाने सामाजिक माध्यमांवर प्रत्युत्तर देत ‘तुमच्याकडे ना संस्कृती, ना इतिहास, ना सन्मान आहे’, अशा शब्दांच टीका केली.

यासह इराणच्या सैनिकी अधिकार्‍यांनी ‘आमच्यावर आक्रमण झाल्यास त्यास तात्काळ आणि कठोर प्रत्युत्तर दिले जाईल’, असे स्पष्ट केले. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनीही ‘इराणच्या नेतृत्वाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही’, अशी चेतावणी दिली.

अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराची मिरवणुकीस प्रारंभ

अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराची मिरवणूक ३ जुलैपासून तेहरानमध्ये चालू झाली असून ९ जुलैला त्यांच्या जन्मगावी मशहद येथे दफनविधी होणार आहे. या कालावधीत इराणमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.