Badrinath Dham Donation Theft : बद्रीनाथ धाम येथेही दानाची चोरी झाल्याचा आरोप

मंदिर समितीकडून चौकशीचा आदेश

डेहराडून (उत्तराखंड) – राज्यातील प्रसिद्ध बद्रीनाथ धाम येथे दानाची चोरी झाल्याचा संशय सामाजिक माध्यमांत व्यक्त केला जात आहे. सामाजिक माध्यामांध्ये हे वृत्त मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यावर ‘बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती’ने या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश दिला आहे. श्रीराममंदिरातील दानाच्या चोरीचा आरोप झाल्यानंतर बद्रीनाथ धाममध्येही अशा प्रकारची चोरी झाल्यावर भाविकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

१. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी सांगितले की, सामाजिक माध्यमांद्वारे केल्या गेलेल्या या आरोपांची समितीने गांभीर्याने नोंद घेतली आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे, तसेच ज्या कर्मचार्‍यांवर संशय व्यक्त केला जात आहे, त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

२. सामाजिक माध्यमांमध्ये आरोप करण्यात आला की, या प्रकरणातील मुख्य आरोपी हा द्विवेदी यांचा ‘वैयक्तिक सचिव’ आहे. या वृत्ताचे खंडन करतांना द्विवेदी यांनी स्पष्ट केले की, संबंधित व्यक्ती त्यांची ‘वैयक्तिक सचिव’ नाही. ती व्यक्ती मंदिर समितीच एक नियमित सरकारी कर्मचारी आहे. जर अन्वेषणात हे आरोप खरे ठरले, तर कोणत्याही दोषीला पाठीशी घातले जाणार नाही आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

३. मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोहन सिंह रंगड यांनी सांगितले की, चौकशी समिती सर्व उपलब्ध पुरावे, सीसीटीव्हीमधील चित्रीकरण आणि संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवून अहवाल सादर करणार. जर अन्वेषणाच्या वेळी कोणताही गैरव्यवहार किंवा अनियमितता आढळून आली, तर ‘श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती कायदा, १९३९’ आणि कर्मचारी आचारसंहिता यांनुसार दोषींवर कठोर कायदेशीर आणि विभागीय कारवाई केली जाईल.

४. हा संवेदनशील विषय असल्याने जोपर्यंत अधिकृत अन्वेषण पूर्ण होत नाही आणि सत्य समोर येत नाही, तोपर्यंत नागरिकांनी समाजिक माध्यमांवरील कोणत्याही प्रकारच्या अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवू नयेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सोहन सिंह रंगड यांनी केले आहे.

संपादकीय भूमिका

भारतातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांविषयी असा अपप्रचार करून हिंदूंच्या मंदिरांची अपकीर्ती करण्याचे हे षड्यंत्र तर नसेल ना ?, याचीही चौकशी होणे आवश्यक !