मानव त्यांचा बराचसा वेळ आनंद आणि समाधान यांच्या शोधात घालवतो. विज्ञान अन् तंत्रज्ञान यांत विलक्षण प्रगती असूनही चिरस्थायी आनंद दुर्मिळ वाटतो. आपण शांतता आणि सुरक्षितता यांची आस बाळगतो; पण त्याच वेळी संघर्षाविषयी आपल्याला आकर्षणही वाटते. हिंसाचार बातम्यांमध्ये भरून रहातो, तर मनोरंजन आक्रमकता आणि सूडाला प्रशंसनीय किंवा शौर्यपूर्ण म्हणून चित्रित करते. अगदी राष्ट्रेसुद्धा स्वतःचे मतभेद मिटवण्यासाठी लढाईचा मार्ग अवलंबतात. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो, म्हणजे मानवी जीवनाचे प्रयोजन स्वतःला पूर्णपणे समजले आहे का ?

१. जीवनात स्वतःच्या निवडीचा प्रश्न उद्भवण्यापूर्वीच काही गोष्टी अस्तित्वात असणे
ज्या विविध ओळखींच्या आधारे लोक आपापसांत संघर्ष करतात, त्या ओळखींच्या पलीकडे एक अशी वास्तविकता आहे, जी सर्वांसाठी समान आहे. आपण कोणत्या शरिरात जन्म घ्यावा, याची निवड आपण स्वतः करत नाही, तसेच स्वतःचे आई-वडील, रूप, राष्ट्रीयत्व, भाषा, विचारसरणी किंवा जन्माच्या वेळची परिस्थिती या गोष्टींची निवडही आपण करत नाही. व्यक्तीच्या स्वतःच्या निवडीचा प्रश्न उद्भवण्यापूर्वीच या गोष्टी अस्तित्वात असतात.
ध्येयापर्यंत पोचण्यापेक्षा त्यापर्यंतच्या प्रवासाचा आनंद घेणे महत्त्वाचे !

जर परिस्थिती नेहमीच निवडता येत नसेल, तर कदाचित् स्वतःच्या प्रतिसादांची गुणवत्ता लक्षात येण्यापेक्षा अधिक महत्त्वाची असते. त्यामुळे आव्हाने ही जीवनातील केवळ अडथळे नसून ती स्वतःच्या व्यक्तीमत्त्वाचे असे पैलू उघड करतात, जे अन्यथा लपलेलेच राहिले असते. संयम सहसा विनाविलंब सापडत नाही. धैर्य क्वचितच अनिश्चिततेविना प्रकट होते आणि करुणा अनेकदा दुःख अनुभवल्यानंतरच प्रकट होते. त्यानंतर विशिष्ट परिणामांविषयीची स्वतःची आसक्ती हळूहळू न्यून होऊ शकते; कारण अनुभव वारंवार हेच दाखवून देतात की, एखाद्या ध्येयापर्यंत पोचण्यापेक्षा त्याच्या प्रवासाचा पुरेपूर आनंद घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
– आनंदा मॅथ्यूज
२. पालट होणे, हे दैनंदिन जीवनात असणारे मूलभूत वास्तव
दैनंदिन जीवन आणखी एका मूलभूत वास्तवाची जाणीव करून देते आणि ते म्हणजे पालट अटळ आहे. शरीर प्रगल्भ होते. नातेसंबंधांचे स्वरूप पालटते. परिस्थिती पालटत जाते. लोक आपल्या आयुष्यात येतात आणि नंतर अनपेक्षितपणे निघून जातात. काळाच्या ओघात दृश्यमान असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये पालट होतो. मानवासाठी ‘पालट’ हीच एकमेव शाश्वत गोष्ट आहे.
३. वास्तवाची जाणीव असूनही मानवाचा संघर्ष जीवनाच्या प्रवाहाच्या विरुद्ध
मानव म्हणून स्वतःच्या अस्तित्वाचा मूळ आधार जर आपल्या नियंत्रणाबाहेर असेल, तर मग आयुष्य आपल्यासमोर जे काही घेऊन येते, त्याला आपण इतका तीव्र विरोध का करतो ? वास्तवाची जाणीव असूनही मानवजातीचा मोठा भाग जीवनाच्या प्रवाहाविरुद्धच संघर्ष करत असतो. लोक अशा गोष्टींशी झुंज देतात, ज्या त्यांच्या नियंत्रणात नसतात, जेव्हा घटनाक्रम त्यांच्या कल्पनेपेक्षा वेगळा घडतो, तेव्हा ते हताश होतात. जेव्हा वास्तव त्यांच्या अपेक्षांशी जुळत नाही, तेव्हा अनेकदा निराशा, संघर्ष आणि अस्वस्थता निर्माण होते. तक्रार करणे आणि भांडणे करणे, हा मानवाचा आवडता उद्योग बनला आहे. आपण परिस्थितीशी वाद घालतो, परिणामांना विरोध करतो आणि पालटांशी संघर्ष करतो; तरीही आपण त्याला मान्यता देवो वा न देवो, जीवन मात्र पुढे सरकतच रहाते. वास्तवाशी दिलेला लढा हा असा संघर्ष आहे, जो आजवर कुणीही जिंकलेला नाही. म्हणूनच मानवी दुःख हे केवळ आव्हानात्मक परिस्थितीशीच नव्हे, तर जीवनाला विरोध करण्याशी जोडलेले दिसते. यातून एक महत्त्वाची शक्यता समोर येते ती, म्हणजे स्वतःची बरीचशी अस्वस्थता ही घटनांमधून नव्हे, तर त्या घटनांवरील प्रतिक्रियांमधून उद्भवत असावी.
४. स्वतःचे लक्ष भूतकाळ आणि भविष्यकाळ यांकडे असल्यास वास्तव स्वीकारता येणे अवघड
स्वतःचे लक्ष भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यात किती विभागलेले असते, यावरून वास्तव किती स्वीकारले, ते स्पष्ट होते. मानवजात अनेकदा निराशा किंवा पश्चात्तापाने रंगलेल्या आठवणींना उजाळा देते आणि त्याच वेळी भविष्यावर आशा, भीती अन् अपेक्षा यांचे प्रक्षेपण करते. तरीही जीवन केवळ वर्तमानातच अनुभवले जाते; कारण ‘आता’चा क्षण हेच एकमेव वास्तव आहे. भूतकाळ संपला आहे. भविष्यकाळ पालटता येतो, जो काही अंशी आपण आता काय निवडतो, यावर अवलंबून असतो.
५. विचार आणि ध्येयपूर्ती यांच्या ध्यासात अधिक मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष होणे
आपण आपल्या विचारांमध्ये आणि ध्येयपूर्तीच्या ध्यासात इतके गुंतून जातो की, एखाद्या अधिक मूलभूत गोष्टीकडे स्वतःचे दुर्लक्ष होते. आपल्या योजना अपेक्षेप्रमाणेच पार पडतात का ? क्वचितच. दिशा पालटतात. परिस्थिती पालटते. जे एकेकाळी अत्यावश्यक वाटत होते, ते लवकरच अनावश्यक ठरते. जागतिक घटना हेच वास्तव उघड करतात, आपल्याला आवडले किंवा नाही, तरी जीवन पुढे जातच रहाते आणि आपल्या पलीकडचे नियंत्रण मर्यादितच रहाते.
६. प्रामाणिकपणाचा प्रारंभ वास्तवाच्या स्वीकारण्यानेच !
जर जीवनातील परिस्थिती अनिश्चित आणि नियंत्रण नगण्य असेल, तर कदाचित् स्वतःची पूर्तता पूर्णपणे त्यावर अवलंबून राहू शकत नाही. म्हणूनच स्वीकारणे आपल्याला वास्तवासह जगायला शिकवतो. आपण त्यात कसे सहभागी होतो, हे स्वतःच्या प्रतिक्रिया ठरवतात आणि अनेक अर्थांनी प्रामाणिकपणाचा प्रारंभ वास्तवाच्या स्वीकारण्यानेच होतो.

७. सकारात्मक प्रतिसाद कठीण वाटणार्या परिस्थितीला पालटू शकतात
जरी घटना नेहमीच आपल्या नियंत्रणात नसतात, तरी आपण त्यांना कसा प्रतिसाद देतो, हे मात्र नेहमीच आपल्या नियंत्रणात असते. प्रत्येक क्षणी सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिसादांमध्ये निवडीचा एक तिठा असतो तो, म्हणजे संयम कि राग ?, समज कि कटुता ? सहकार्य कि संघर्ष ? निःस्वार्थ सेवा कि स्वार्थ ? एखादी गोष्ट आपण करू शकतो, याचा अर्थ असा नाही की, आपण ती केलीच पाहिजे. आपल्या निवडींचा एकत्रित परिणाम हळूहळू जीवनाची दिशा आणि गुणवत्ता प्रभावित करतो. याच कारणामुळे आपले निर्णय अखेरीस परिस्थितीपेक्षा अधिक महत्त्वाचे ठरू शकतात. आपण आता जे निवडतो, ते भूतकाळात केलेल्या कोणत्याही गोष्टींपेक्षा अधिक शक्तीशाली असते; कारण सकारात्मक प्रतिसाद अनेकदा प्रारंभीला कठीण वाटणार्या परिस्थितींना पालटतात.
८. प्रामाणिकपणा, सहानुभूती आणि जुळवून घेण्याची क्षमता या गुणांमुळे होणारा सकारात्मक प्रभाव
प्रामाणिकपणा, सहानुभूती आणि जुळवून घेण्याची क्षमता यांसारखे गुण एकदा अंगी बाणवले की, ते केवळ इतरांनाच लाभ देत नाहीत, तर ते व्यक्त करणार्या व्यक्तीच्या अनुभवांनाही आकार देतात, ज्यामुळे देणारा अन् घेणारा या दोघांवरही सकारात्मक प्रभाव पडतो. जे लोक नकारात्मक वागतात, त्यांनाही दुःख भोगतांना सहानुभूतीपूर्ण प्रतिसाद मिळावा, अशी इच्छा असते. यावरून असे सूचित होते की, सहानुभूती ही स्वतःच्या नैसर्गिक अवस्थेच्या कल्पनेपेक्षाही अधिक जवळची असू शकते.
९. ‘मी जीवनाला कसा प्रतिसाद देईन’, ही स्वतःची भूमिका हवी !
जर प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या कृतींची पर्वा न करता परोपकारी वागणूक हवी असेल, तर आपण सातत्याने इतरांना तीच काळजी का देत नाही ? जर आपल्याला स्वतःला इजा व्हावी, अशी इच्छा नसेल, तर इतरांना इजा पोचवणे का समर्थनीय ठरते ? आपण जे काही निवडतो, ते शेवटी आपल्याकडेच परत येते, हे आपण अनेकदा विसरतो. जर प्रत्येकालाच प्रतिष्ठा आणि आदर हवा असेल, तर इतरांशी वागतांना या तत्त्वांचे पालन करणे, ही केवळ एक आदर्श गोष्ट न रहाता जगण्याची एक व्यावहारिक पद्धत बनते. या जाणिवेसह आपण जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटू शकतो. ‘मला जीवनाकडून काय मिळेल ?’, असा प्रश्न विचारण्याऐवजी ‘मी जीवनाला कसा प्रतिसाद दिला पाहिजे ?’ आणि ‘पृथ्वीवरील माझ्या काळात मी कोणते सर्वोत्तम योगदान देऊ शकतो ?’, असे प्रश्न आपण विचारू शकतो. अशा वेळी मानवी जीवन आपल्याला इतरांच्या कल्याणासाठी सकारात्मक योगदान देत असतांनाच जीवनात विधायक सहभाग कसा घ्यावा, हे शिकवू शकते. या दृष्टीकोनातून पाहिल्यास जगणे, म्हणजे नियंत्रणासाठी केलेला संघर्ष न वाटता ती एक परिवर्तनाची प्रक्रिया वाटते.
(क्रमश:)
लेखक : आनंदा मॅथ्यूज, हॉलीवूड ‘सिनेमॅटोग्राफर’ (चलचित्रीकरण तज्ञ), ‘इन क्वेस्ट ऑफ गुरु’ पुस्तकाचे लेखक, गोवा. (२६.६.२०२६)
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/1057623.html
महाराष्ट्रात मराठी भाषेची होत असलेली दुरवस्था आणि सरकारसह प्रशासनाचे कर्तव्य !
थिरूवनंतपूरम् येथील भाजप नगरसेवकांच्या शपथविधीविषयी केरळ उच्च न्यायालयाची भूमिका !
स्वामी विवेकानंद यांचे विचार दूरदर्शी !
हरवलेल्या श्रद्धेचा हिंदुत्ववाद !
जीवनातील सकारात्मकता आणि जीवनाचे खरे कार्य !
अध्यात्मातील विविध परिभाषांचे किंवा शब्दांचे आध्यात्मिक अर्थ !