
युरोप खंडातील प्रखर उष्णतेच्या लाटेमुळे गेल्या १० दिवसांत १ सहस्र ४०० हून अधिक लोक दगावले आहेत. त्यातील १ सहस्र एकट्या फ्रान्समधील आहेत. युरोप खंडात जर्मनी, फ्रान्स, रशिया, युनायटेड किंगडम्, पोर्तुगाल, पोलंड, नॉर्वे, ग्रीस, ऑस्ट्रिया, नेदरलँड, स्वित्झर्लंड यांसारख्या महत्त्वाच्या देशांसह ४१ लहान-मोठे देश येतात. सध्या युरोपमध्ये तापमान अधिकाधिक ४४ अंश सेल्सियसच्या आसपास आणि न्यूनतम तापमान ३० अंश सेल्सियसच्या आसपास जात आहे. खरे तर भारताशी तुलना करता हे तापमान पुष्कळ अधिक आहे, असे नाही; परंतु ‘तेथील उष्णतेची लहर काही वेगळ्याच प्रकारची आहे’, असे म्हटले जात आहे. याखेरीज नेहमी थंड वातावरणात रहाणार्या तेथील जनतेसाठी उष्णतेचा हा कहर परिणामकारक झाला आहे. तेथील बाजारात वातानुकूलन यंत्रे (एसी), पंखे, शीतयंत्रे आदी घेण्यासाठी झुंबड उडाल्याचे व्हिडिओ प्रसारित होत आहेत. ते बसवण्यासाठी तांत्रिक कारागिरांची न्यूनता भेडसावत आहे. फ्रान्समध्ये प्लास्टिकचे सिग्नलही वितळून गेल्याचे व्हिडिओ आले. शाळांना सुट्या देण्यात आल्या आहेत. ही परिस्थिती भीषण होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. वृद्धांवर उष्णतेच्या लहरींचा परिणाम अधिक होत आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेने या उष्णतेच्या लाटेला ‘नकळत जीव घेणारी’ (सायलंट किलर) म्हटले आहे. जर्मनीमध्ये दुसर्या महायुद्धातील स्फोटकांचा उष्णतेमुळे स्फोट झाला. त्यामुळे तेथील जंगलांना आगी लागल्याच्याही घटना घडल्या. या वणव्यांनी तेथील उष्णतेत भर टाकली. जर्मनीत अनेक घरे, संस्था, रुग्णालये येथे वातानुकूलन यंत्रे नाहीत. जर्मनीत उष्णतेमुळे रेल्वेगाड्या रहित करण्यात आल्या आहेत. मोठे संगीत महोत्सव, मोर्चे आदींसारखे कार्यक्रम रहित केले जात आहेत. रस्त्यांवर गाड्यांमधून पाण्याचे मोठे फवारे उडवले जात आहेत. रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी पाण्याचे मोठे टँकर आणून त्याला विविध लहान-मोठ्या फवार्यांचे नळ लावले आहेत आणि कारंजाप्रमाणे त्याचे पाणी रस्त्यात उडवले जात आहे अन् नागरिक त्यात अखंड भिजत आहेत. भरपूर उष्णता सहन करू शकणार्या भारतियांनाही जर्मनीतील ३० ते ३५ अंश सेल्सियस तापमानही सहन होत नाही, अशी विचित्र उष्णता तेथे आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पॅरिसमध्ये सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास बंदी घालण्यात आली आहे. उष्णतेमुळे अडकवलेल्या केळ्याच्या घडांमधील केळी साली घडालाच सोडून खाली पडत आहेत, असे गमतीशीर व्हिडिओही प्रसारित होत आहेत. रस्त्यावरील डांबर वितळले असून ते गाड्यांच्या चाकांना मोठ्या प्रमाणात चिकटून निघून येत आहे. रूळांचे आकार पालटत आहेत. इतकेच नव्हे, तर रस्त्यावर उभ्या असणार्या गाड्यांचे प्लास्टिकच्या भागांचे आकारही पालटले आहेत. युरोपमधील लोक घराबाहेर पडणे टाळत आहेत. या सर्व वर्णनावरून युरोपमधील जनजीवनावर उष्णतेच्या लाटेचा किती प्रमाणात विपरीत परिणाम झाला आहे, याचा अंदाज आपण लावू शकतो. तुलनेने ‘भारतात येणार्या काळात दुष्काळ पडणार’, असे सांगितले असले, तरी देवाच्या कृपेने सध्या तरी आपण सुरक्षित आहोत, असेच म्हणावे लागेल.
हा उष्णतेचा कहर हा ‘अल निनो’ पर्यावरणीय स्थितीचा प्रभाव आहे. प्रशांत महासागराच्या विषुववृत्ताजवळील मध्य आणि पूर्व भागातील (दक्षिण अमेरिकेजवळील) समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान नेहमीपेक्षा अधिक वाढते. त्यामुळे जगभरातील हवामानावर परिणाम होतो. यात समुद्राचे तापमान वाढून वार्यांचे स्वरूप पालटल्याने पावसाचेही स्वरूप पालटते. सध्या हवा भूमीवर आदळून अधिक उष्ण होत आहे. १९५० च्या दशकापासून पृथ्वीवरील सर्वच भागांतील तापमान अल्पाधिक प्रमाणात वाढणे चालू झाले आहे. जागतिक हवामान संघटनेच्या म्हणण्यानुसार युरोप, उत्तर अमेरिका आणि चीन येथे विक्रमी तापमान नोंदवले गेल्यामुळे उष्णतेच्या लाटा वर्ष २०२४ मध्ये तीव्र होत राहिल्या. वाढती उष्णता ही सागरी प्रजातींवरही परिणाम करत आहे. काही मासे किनार्याजवळ येऊ लागले आहेत, तर काही स्थलांतर करत आहेत, तर काही प्रजाती नष्ट होतांना दिसत आहेत.
भारतावर परिणाम !
उष्णतेच्या लाटेचा भारतासह जगभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. कामगारांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो, तसेच कृषी क्षेत्रावरही गंभीर परिणाम होऊ शकतात. विजेच्या वापरावर गंभीर परिणाम होऊन त्याचा अंतिमतः परिणाम उत्पादनावर होऊ शकतो. महाराष्ट्रात पाऊस लांबल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी उशिरा पेरणी करण्याचे आवाहन यंदा वारंवार केले होते; मात्र पेरणी लांबली, तर त्याचे अन्य दुष्परिणाम दिसू शकतात. तळकोकणातील काही लोकांनी भाताची रोपे सिद्ध झाल्याने ती वाया जाऊ नयेत; म्हणून शेतात नदीचे पाणी भरून त्याची पेरणी केली. युरोपातील उष्णतेच्या लाटेचा भारतावर थेट परिणाम होणार नसला, तरी काही ना काही अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. भारतात गहू, मका, सूर्यफूल यांच्यावर युरोपमधील उष्णतेच्या लाटेचा परिणाम होण्याची शक्यता आहे. युरोपमध्ये विजेचा तुटवडा निर्माण झाला, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ऊर्जास्रोतांच्या किमती वाढून त्याचा परिणाम युरोपमधून भारतात आयात होणार्या वस्तूंवर होऊ शकतो. या उष्णतेच्या लाटेमुळे पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत असल्याने त्याचा अप्रत्यक्ष परिणाम भारतावरही होणारच आहे.
मानवच उत्तरदायी !
‘युरोपमध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेला अंतिमतः मानवच उत्तरदायी आहे’, असे तज्ञ शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ‘इम्पिरियल कॉलेज लंडन’चे संशोधक आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक थिओडोर कीपिंग यांचे म्हणणे आहे की, ‘काळानुसार उष्णता वाढते’, असे म्हटले, तरी ही उष्णतेची लाट पुष्कळच अधिक आहे. ‘हवामान पालटाचे सर्वांत वाईट परिणाम टाळण्यासाठी तापमान वाढ मर्यादित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे’, यावर शास्त्रज्ञांचे एकमत आहे. वर्ष २००३ मध्ये प्रचंड उष्णतेची लाट आली होती; तरीही ती अशा प्रकारची उष्णता नव्हती. युरोपमधील ४५ टक्के शहरांनी उष्णतेचे विक्रम मोडले आहेत. ‘वर्ल्ड वेदर ॲट्रिब्युशन’ने म्हटले आहे की, जर आपल्याला भविष्यात आणखी वाढणारे तापमान आणि त्याचे परिणाम टाळायचे असतील, तर जीवाश्म इंधनाचा वापर त्वरित टप्प्याटप्प्याने बंद करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोळसा, तेल आणि वायू यांच्या ज्वलनामुळे पृथ्वीचे तापमान पूर्व-औद्योगिक काळाच्या तुलनेत अनुमाने १.४ अंश सेल्सियसने वाढले आहे. अध्यात्मशास्त्रानुसार साधनेने मानव संतुलित रहातो. त्यामुळे निसर्गही मानवाला अनुकूल असतो. साधनेअभावी असंतुलित झालेल्या मानवाने केलेल्या चुकांचे परिणाम निसर्ग सध्या चुकता करत आहे, असेच म्हणावे लागेल !


संपादकीय : पश्चिम घाटाचे रक्षण करा !
‘जीविधा’ संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला !
PM Modi Appeals No POP : मातीपासून बनवलेल्या श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करा !
संपादकीय : श्रीरामावरील आघात !
संपादकीय : अवघ्या पावणे दोन मासांत शिक्षा !
संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !