दोन आरोपींना जन्मठेप आणि एकाची निर्दाेष मुक्तता

गुहागर येथील विश्वास खरे हत्या आणि दरोड्याचे प्रकरण

गुहागर – तालुक्यातील बहुचर्चित विश्वास खरे हत्या आणि दरोडा प्रकरणात १२ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर निकाल लागला आहे. चिपळूण येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश मा. डी.बी. म्हालटकर यांनी मुख्य आरोपींना जन्मठेप सुनावली आहे, तर एका आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद रजिस्टर क्रमांक ६७/२०१४ (भा.दं.वि. कलम ३०२, ३९४, ३४) या खटल्याचा निकाल देतांना न्यायालयाने आरोपी अमोल चंद्रकांत गाढवे (रा. बोफखेल, खडकी, पुणे) आणि किरण रामदास कुचेकर (रा. उत्तमनगर, वारजे माळवाडी, पुणे) यांना दोषी ठरवले. या दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी १ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास आणखी ६ महिन्यांची सक्तमजुरी भोगावी लागणार आहे. याच प्रकरणातील अन्य एक आरोपी विष्णु किसन कनपुरे (रा. पुणे) यांची मात्र सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

१ ऑक्टोबर २०१४ या दिवशी येथील कासव संरक्षक विश्वास खरे त्यांच्याच होमस्टेमध्ये गळ्यातील सोन्याची चैन चोरण्याच्या उद्देशाने २ पर्यटकांनी विळा आणि सुर्‍याचे वार करून त्यांची निघृण हत्या केली होती.

या गाजलेल्या प्रकरणात गुहागर पोलिसांनी केलेले सखोल, शास्त्रीय आणि पुराव्यांवर आधारित अन्वेषण हे निकालाचा मुख्य कारण ठरले. या अन्वेषणादरम्यान गोळा करण्यात आलेले परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सरकारी पक्षाने न्यायालयात भक्कम बाजू मांडली.

या प्रकरणाचे अन्वेषण तत्कालीन पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, तसेच एस्. एल. पाटील यांनी केला होता. पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या खटल्याचा प्रभावी पाठपुरावा करण्यात आला. न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू सरकारी अधिवक्ता पी.आर्. साळवी यांनी मांडली.