मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील देवद-विचुंबे येथील अनधिकृत नळजोडणी खंडित !

नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील देवद-विचुंबे येथील अनधिकृत नळजोडणी १९ जून या दिवशी पोलीस बंदोबस्तात खंडित करण्यात आली.या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले असून जलवाहिनीशी पुन्हा अयोग्य हाताळणी करण्याचा प्रयत्न झाल्यास पोलीस संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करतील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

१. मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीतून शहराला पाणीपुरवठा करणार्‍या २ सहस्र ५० मि.मी. व्यासाच्या मुख्य भूमीगत जलवाहिनीवर पनवेल तालुक्यातील देवद आणि विचुंबे ग्रामपंचायत हद्दीत काही व्यक्तींच्या माध्यमातून अनधिकृत नळजोडणी करून पाण्याचा वापर होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पहाणी केली असता मुख्य जलवाहिनीवर १०० मि.मी. व्यासाची अनधिकृत नळजोडणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

२. एप्रिल २०२५ नंतर जानेवारी २०२६ मध्येही अनधिकृत नळजोडणी महानगरपालिकेने त्वरित खंडित केली. विचुंबे आणि देवद ग्रामपंचायतींना अनधिकृत नळजोडणीद्वारे वापरलेल्या पाण्यापोटी १ कोटी १७ लाख ६१ सहस्र रुपये दंड भरणा करण्याची नोटीस बजावण्यात आली होती.

३. मुख्य जलवाहिनीशी छेडछाड करणे, अनधिकृत नळजोडणी करणे अथवा पाण्याची चोरी करणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे सार्वजनिक मालमत्तेची हानी होते. नवी मुंबई शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊन नागरिकांच्या पाणीपुरवठा सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो. हा प्रकार तिसर्‍यांदा निदर्शनास आल्याने खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून नळजोडणी खंडित करण्यात आली.