राष्ट्रभक्त शास्त्रज्ञ !

एखाद्या भारतियाला जागतिक स्तरावर एखादा पुरस्कार देऊन सन्मानित केल्यावर भारतियांना त्याची ओळख होते. असेच एक प्राध्यापक अशोक सेन हे थोर भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी ‘स्ट्रिंग थिअरी’ या विषयात केलेले संशोधन विश्वाच्या मूलभूत रचनेला समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यांना वर्ष २०१२ मध्ये जेव्हा जगातील सर्र्वांत मोठ्या मानल्या जाणार्‍या ‘फंडामेंटल फिजिक्स प्राईज’ या पुरस्कारासह ३ मिलियन डॉलर (जवळपास १७ कोटी) मानधन मिळाले, त्यानंतर त्यांची ओळख भारतियांना पटली होती. त्यातील मोठा भाग त्यांनी शाळा, गरीब विद्यार्थी आणि विज्ञान संशोधन यांसाठी दान केला. यातून त्यांची सामाजिक जाणीव दिसून आली. ते बेंगळुरू येथील ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरेटिकल सायन्सेस’ येथे विशेष प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रयागराज येथील ‘हरिश्चंद्र रिसर्च इन्स्टिट्यूट’ मध्ये २० वर्षांहून अधिक काळ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. कठीण विषय सोप्या भाषेत समजावून सांगण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे ते ओळखले जातात. त्यांनी ‘क्वांटम मेकॅनिक्स’ आणि ‘स्ट्रिंग थिअरी’ यांसारख्या प्रगत अन् क्लिष्ट विषयांवर अनेक व्याख्याने दिली असून त्यांच्या नोट्स आणि व्हिडिओ संपूर्ण जगातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. ते एक आदर्श आणि नम्र शिक्षक म्हणून प्रसिद्ध असून जगभरातील विद्यार्थी त्यांचा आदर करतात.

परदेशात मोठ्या वेतनाच्या आणि सर्व सुखसोयींनी युक्त असलेल्या नोकर्‍या सोडून त्यांनी भारतात राहून तरुण पिढीला शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १९९० च्या दशकात केलेल्या शोधामुळे जगभरातील शास्त्रज्ञांना ‘कृष्णविवर’ आणि गुरुत्वाकर्षण यांमधील गुंतागुंतीचे नियम समजून घेणे सोपे झाले. त्यांच्या या जागतिक दर्जाच्या कामामुळे भारताचे नाव विज्ञानाच्या क्षेत्रात जगभर उंचावले गेले. शांतपणे आणि अविरतपणे काम करणारे सेन आज जगभरात प्रसिद्ध झाले, ते त्यांच्या कृतीमुळेच. यातून हे शिकता आले की, प्रसिद्धीसाठी त्यांनी कधीच कार्य केले नाही; पण त्यांच्या मेहनतीच्या जोरावरच त्यांच्या भौतिकशास्त्रातील विविध शोधांमुळे ते जगन्मान्य झाले. वर्ष २०१३ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. भारतात राहूनही मोठे संशोधन करता येते आणि लाभ भारतियांना मिळू शकतो, हे त्यांच्या महान कार्यातून दिसून आले. जगण्यातील साधेपणा, विचारांची प्रगल्भता आणि कृतीतील सामर्थ्य यांमुळेच त्यांनी एक नवे शिखर प्राप्त केले, तरीही ते आज प्रतिदिन ‘सायकल’वरून महाविद्यालयामध्ये जातात. त्यांचा मोठेपणा त्यांच्या ‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’ यातच आहे. प्रत्येक भारतियाने जर त्यांच्यासारखे राष्ट्रप्रेम स्वतःत निर्माण केले, तर एक नवीन आणि उज्ज्वल भारत निर्माण होईल, यात शंका नाही !

– श्री. आल्हाद माळगावकर, देवद, पनवेल.