देश धर्मशाळा नसल्याने घुसखोरांना भारतात राहू देणार नाही ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

उपस्थितांना संबोधित करतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 

कोल्हापूर, २० जून (वार्ता.) – वर्ष २०१४ च्या अगोदरच्या सत्तेतील शासकांनी घुसखोरांचीच मतपेढी बनवली होती; मात्र बंगालच्या विजयाच्या निमित्ताने मी सगळ्या देशाला सांगू इच्छितो की, हा देश धर्मशाळा नाही. या देशातील एक आणि एक घुसखोराला शोधून काढू अन् या देशात एकाही घुसखोराला राहू देणार नाही. भारताची सुरक्षितता सगळ्यांत महत्त्वाची असून या देशात ज्यांचा जन्म झाला आहे, त्यांनाच या देशात रहाण्याचा अधिकार आहे, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ते पोलीस परेड मैदानात ‘भव्य कृतज्ञता सोहळ्या’च्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत बोलत होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढे म्हणाले, ‘‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिराची विकासकामे पूर्ण झाल्यावर त्यातून भक्तीचे पुनर्जागरण होईल. त्यामुळे ५ महिन्यांच्या आत ही कामे पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. अयोध्या येथील भव्य श्रीराममंदिर, काशी विश्वनाथचा कॉरिडॉर (प्रशस्तमार्ग), केदारनाथ-बद्रीनाथ यांचा विकास भाजप सरकारने केला आहे. श्री महालक्ष्मीदेवीच्या विकास आराखड्याच्या कामात पुढाकार घेऊन महाराष्ट्रात धर्माचे शासन असून ‘ते संस्कृतीचे आदर करते’, हे दाखवून दिले आहे. गेल्या १२ वर्षांत या देशात भाषा, संस्कृती यांचे पुनरुत्थान, तसेच सीमेचे संरक्षण अशा प्रत्येक क्षेत्रात काम झाले आहे. इतकेच नाही, तर चंद्रावर यान पाठवण्याचे महत्त्वाचे कार्यही मोदी शासनाने केले आहे.’’

सभेसाठी उपस्थित जनसमुदाय 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राने संपूर्ण देशाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत वेगळी ओळख दिली आहे. अमित शहा हे अतिशय कणखर गृहमंत्री असून देशातील नक्षलवाद संपवण्याचे काम केंद्रीय गृहमंत्र्यालयाद्वारे पूर्ण झाले. त्याचसमवेत सहकार क्षेत्रात अनेक लोकाभिमुख पालट अमित शहा यांनी घडवले आहेत.’’ या प्रसंगी विविध मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, तसेच कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


राज्यातील ५ ज्योतिर्लिगांसह कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा मंदिराचा विकास चालू ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक शक्ती पुनर्जीवित होत आहे. राज्यातील ५ ज्योतिर्लिगांसह कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा मंदिराचाही विकास चालू आहे. पंढरपूर ‘कॉरीडॉर’चे काम याच वर्षी आम्ही चालू करत आहोत. श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील विकासकामांना गावकर्‍यांचा मोठा पाठिंबा मिळत असून गावकर्‍यांनी अख्खे गाव दीड किलोमीटर स्थलांतर करण्यास अनुमती दर्शवली आहे.’’

भाजपचे खासदार श्री. धनंजय महाडिक यांनी श्री महालक्ष्मीदेवीची प्रतिमा देऊन, तर शिवसेनेचे खासदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी तलवार देऊन गृहमंत्र्यांचा सत्कार केला. केंद्रीय गृहमंत्र्यांनी ‘भारतमाता की जय’, ‘जय भवानी-जय शिवाजी’, अशा घोषणा देऊन त्या उपस्थितांना देण्यास सांगितले.